पुणे | प्रतिनिधी Pune
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या स्वदेशी नेटवर्कचे उद्घाटन ओडिशा येथील झारसुगुडा येथे करण्यात आले. तर महाराष्ट्रातील या सेवेचा प्रारंभ पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास पुण्यातून ऑनलाईन स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास व परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार, दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वदेशी ‘4-जी’ प्रणालीद्वारे अनेक गावे एकमेकांशी जोडली जाणार असून, यातून देशातील खेडय़ापाडय़ातील जनता जगाशी संपर्क साधू शकणार आहे. या प्रणालीच्या वापराद्वारे आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग-व्यवसाय अशा विविध व्यवस्थांशी एका क्लिकवर संपर्क साधता येणार आहे. स्वदेशीचा नारा देत विकसित भारताचे स्वप्न बघताना हे आधुनिक तंत्रज्ञान मोठी क्रांती घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. राज्य सरकारने लवकरच अकराशे सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की देशासमोर जेव्हा केव्हा आव्हाने उभी राहिली किंवा देशावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तंत्रज्ञान, तेज, कर्तव्यता एकत्रित करून देशाने जगाला समर्थपणे उत्तर दिले आहे. या निर्मितीमुळे संपूर्ण स्वदेशी प्रणाली विकसित करणारा भारत हा जगाच्या पाठीवरील पाचवा देश बनला आहे. विकसित भारत ही संकल्पना साकार करण्यासाठी बीएसएनएलच्या शुद्ध 100 टक्के स्वदेशी बनावटीच्या 4-जी प्रणालीचा मोठा हातभार लागणार आहे. राज्य सरकार लवकरच अकराशे सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देणार असून, या सेवा कार्यान्वित होण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे व याचा उपयोग खेडय़ापाडय़ातील आदिवासी भागातील नागरिकांना होणार आहे.
भारत नावाच्या शक्तीची उंच झेप :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिंदे म्हणाले, की या प्रणालीचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर उपयोग होणार आहे. देशाची वाटचाल सक्षमतेकडे होत असून, विकास आणि ज्ञानाच्या यज्ञात महाराष्ट्र मागे राहणार नाही.
सुरक्षिततेचीही जपणूक : रक्षा खडसे
खडसे म्हणाल्या, की स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानामुळे देशाची सुरक्षितताही जपली जाणार आहे. बीएसएनएलने केवळ 22 महिन्यांमध्ये हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.





