
नाशिक, २८ ऑगस्ट २०२६ : जिमाका वृत्तसंस्था Nashik
‘कुंभ भक्ती संगम’च्या पहिल्या दिवसाची सांगता राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने भक्तिरसात झाली. ठक्कर डोम येथे झालेल्या या विशेष संगीत कार्यक्रमात अभंगांच्या भावपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक अभंगांना संगीताच्या विविध रंगांची जोड देत राहुल देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘गजर’ने सुरू झालेल्या या अभंगवारीत ‘राजस सुकुमार’, ‘भाग्यदा’, ‘आनंदाच्या कोटी’ आणि ‘खेळ मांडियेला’ यांसारख्या रचनांनी मैफलीत रंग भरला. त्यानंतर ‘काळ देहासी’, ‘अबीर गुलाल’, ‘तीर्थ विठ्ठल’ आणि ‘माझे माहेर’ या अभंगांच्या सादरीकरणातून भक्ती आणि भावनांचा सुरेल आविष्कार झाला. ‘कानडा राजा’ या अभंगाने मैफलीची सांगता झाली.
राहुल देशपांडे यांच्या सोबत कलाकारांची सुरेल साथ
‘अभंगवारी’मध्ये राहुल देशपांडे यांनी मुख्य गायनाची धुरा सांभाळली. त्यांना दीप्ती माटे यांनी मुख्य गायनातून साथ दिली, तर विघ्नेश जोशी यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली.
संगीत संयोजनात निखिल फाटक – तबला, मिलिंद कुलकर्णी – हार्मोनियम, विशाल धुमाळ – की-बोर्ड, निनाद मुळाओकर – बासरी, रोहन वणगे – तालवाद्य, प्रसाद जोशी – पखावज आणि राहुल देव – बास गिटार यांनी साथ दिली.
ऋषिकेश पाटील, निमिष उत्पात आणि राजस जोशी यांनी कोरसची साथ केली. कार्यक्रमाच्या ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी परीक्षित कुलकर्णी यांनी सांभाळली.
वाद्यवृंदातील विविध वाद्यांची सुरेल सांगड, मुख्य गायकांचा आवाज आणि अभंगातील भक्तिभाव यामुळे संपूर्ण सादरीकरणाला विशेष रंगत आली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित ‘कुंभ भक्ती संगम’च्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांना नाशिककर आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या कीर्तनाने सुरू झालेला ‘कुंभ भक्ती संगम’चा पहिला दिवस श्री. राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध अभंगांच्या सादरीकरणाने ठक्कर डोमचा परिसर भारावून गेला आणि भक्ती, संगीत व सांस्कृतिक परंपरेच्या या त्रिदिवसीय सोहळ्याच्या पहिल्या दिवसाची संस्मरणीय सांगता झाली.




