Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : गिते-दराडे लढतीचा जिगसा‍ॅ पझल!

राज-का-रण : गिते-दराडे लढतीचा जिगसा‍ॅ पझल!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असला तरी आता कोण फुटले, दराडेंनी गितेंवर आपलेच पैसे वापरल्याच्या आरोपाचे काय झाले, महाजन यांच्या भूमिकेचे काय, महायुतीची दोनशेहून अधिक मते फुटली ती कोणाची, अशा काही प्रश्नांची उत्तरेही गितेंच्या शिवसेना प्रवेशाच्या वावटळीत हरवून गेली. जे आपलं कधीच नव्हते त्याच्या जाण्याने शोक कशासाठी करायचा, अशा आध्यात्मिक विचारासारखी प्रतिक्रिया या विषयावर दराडेंनी दिल्यामुळे त्यांच्यासारखीच उपरती जर अनेकांना झाली तर सारा राजकीय आसमंतच सुखासीन होऊन जाईल.

विधान परिषदेच्या नाशिक प्राधिकृत मंडळाची निवडणूक म्हणजे एक भलंमोठं कोडे झाले आहे. इंग्रजीत ज्याला जिगसॉ पझल म्हणतात, ते निवडणुकीत व नंतर लागलीच जे काही झाले त्या पार्श्वभूमीवर अधिक जवळ जाणारे आहे. जिगसॉ पझलमध्ये अनेकदा अनियमित आकाराचे, एकमेकांत अडकणारे आणि मोझाइकसारखे दिसणारे तुकडे एकत्र जोडावे लागतात. सामान्यतः प्रत्येक तुकड्यावर चित्राचा एक भाग असतो, जो पझल सोडवून पूर्ण केला जातो. आता वाचकांना जर या निवडणुकीचे कोडे खरोखरच सोडवायचे असेल तर त्यांनी जागावाटपापासून ते निकाल लागल्यानंतर जे काही झाले या कालावधीतील बातम्यांची कात्रणे गोळा करून ती संकलित स्वरुपात समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.

एकवेळ मूळ कोडे सोडवता येईल; पण या निवडणुकीत जे काही झाले त्याचे कोडे सोडवायला खरोखरच अवघड आहे. या पझलचा गाभा म्हणजे ज्या व्यक्तीला दणदणीत पराभूत केले, त्याच्याच पक्षनेत्यांनी विजयी उमेदवारासाठी पायघड्या घालून स्पेशल विमानाने पक्षात घेऊन जाणे. अनेकांना हा काय प्रकार आहे हे अद्यापही समजलेले नाही. आश्चर्य म्हणजे, ज्या नरेंद्र दराडे यांच्या पराभवानंतर हा सारा तमाशा झाला, ते दस्तुरखुद्द दराडे यांनीही मला विचारूनच गितेंना पक्षात घेतल्याने माझा काही आक्षेप नाही, अशी प्रतिक्रियाही दिली. यामुळे तर सामान्य जनतेबरोबरच कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम जायला तयार नाही. आमचे पैसे घेऊन आमच्याशीच गद्दारी केली, असा घणाघाती आरोप करून गितेंवर हल्ला करणारे दराडे नंतर मात्र एकदम गरीब गाय झाले, यानेही लोकांच्या मनातील गुंता अधिक वाढला आहे. राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खाली जात चालली आहे, हे तर दिसते आहेच; पण खाली जातानाच आडव्यातिडव्या मार्गांनीही सुरू झालेले मार्गक्रमण डोयाला मुंग्या आणणारे आहे.

गोकुळ गिते विजयी होणार यात अजिबात शंका नव्हती, याविषयी याच सदरात लिहिलेही होते. आर्थिक कारणांनीच ओळखल्या जाणार्‍या या निवडणुकीत प्रथमच मतदारांनी कोणाला विजयी करायचे हे आधीच ठरवून टाकले असल्याचे या सदरात म्हटले होते. ते तंतोतंत खरे ठरले. गिते व दराडे या दोघांनीही वारेमाप पैसा खर्च करूनही शेवटी गितेच हिरो ठरले, याचे कारण हे मतदारांनी आधी ठरवून ठेवले होते, यात सापडते. दराडे यांच्याविषयी केवळ मतदारांची नाराजी होती, असे नव्हे तर स्वपक्षासह मित्रपक्षांचे नेते आणि आपला प्रभाव टिकवून ठेवलेले तालुयांमधील प्रमुख पुढारी यांनीदेखील यावेळी गितेंची तळी उचलली होती. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी केवळ पैसा हाच काही सर्वस्व नव्हता.

कारण दराडे हीदेखील त्यादृष्टीने बडी आसामी आहे. एवढेच नव्हे तर अखेरच्या क्षणी दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपला खिसा रिकामा केल्याचे सांगितले जाते. असे असेल तर दराडे यांच्यासाठी त्यांचा पक्ष नव्हे पण नेते तरी प्रयत्न करीत होते, असे म्हणता येते. ज्या तत्परतेने उदय सामंत यांनी निकाल लागताच गोकुळ गितेंना नेण्यासाठी विशेष विमान आणले ते पाहता अनेकांना सामंत यांनीच दराडेंचा गेम केला तर नाही ना, असाच संशयही आला. विनाकारण गिरीश महाजन यांना बदनाम केले गेले, असेही काही जणांना नंतर वाटून गेले.

गितेंचे बंधू व या विजयाचे खरे शिल्पकार गणेश गिते यांना अगदी सुरुवातीपासूनच विजयाची खात्री होती. त्यांनी खूप आधीपासूनच पेरणी करून ठेवली होती. त्याचमुळे त्यांना उमेदवारीची अडचण व्हायला लागली तेव्हा त्यांनी लागलीच बंधू गोकुळ यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला; किंबहुना ही रणनीती त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवली असावी. कारण अर्ज भरण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले असताना गोकुळ गितेंचा अर्ज आला. अर्ज भरणे किती किचकट आणि गुंतागुंतीचे होते हे संबंधितांनी अनुभवले आहे. त्यामुळेच गोकुळ यांच्यासंदर्भातील निर्णय ही त्यांची विचारपूर्वक खेळी होती, हे दिसते. गितेंचा सर्वदूर म्हणजेच सगळ्या जिल्ह्यात असलेला दोस्ताना यानिमित्ताने कामी आला.

पालिका निवडणुकीत त्यांनी करून ठेवलेली पेरणी निवडणुकीत मतांची बेगमी करून गेली. गणेश गिते हे निवडणुकीपूर्वीच आम्हाला ३४० मते पडतील, असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगत असत. हे सांगणे म्हणजे विनाकारण छाती फुगविण्यासारखे नव्हते. कोणत्या पालिकेत किती मते मिळतील याची त्यांच्याकडे तंतोतंत आकडेवारी, अगदी नावासह तोंडपाठ होती. त्याचमुळे त्यांना म्हाडाच्या जामीन रद्दची अप्रत्यक्ष धमकी येताच त्यांनी त्यांचा प्लान बी वापरला. गितेंची या विषयातील पारंगतता एवढी होती की त्यांना इतर कोणी जाहीर मदत केली नसती तरी त्यांना विजयापासून रोखता आले नसते. अर्थात, हे काही एका दिवसाचे काम नसते. त्यात सातत्य लागते. दराडे सहा वर्षे आमदार राहिले. त्यांचे बंधूही दुसर्‍यांदा आमदार झाले, तरीही त्यांना सलोखा ठेवता आला नाही. गितेंनी हे केव्हाच हेरले होते, त्यामुळेच त्यांना पराभवाची तीळमात्र शंका नव्हती.

विजयाबाबत ते एवढे निश्चिंत होते की बंधूंनी जेव्हा आजपासून मी प्रचार थांबवित आहे, एवढेच सांगून मंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद सोडली, त्यानंतर यातून जो संदेश द्यायचा तो नेमकेपणाने गेला असे ते म्हणाले होते. एवढी निर्धारपूर्वक तयारी असल्यावर विजयश्रीही त्यांच्याच गळ्यात माळ घालणार हे निश्चित होते. बाकी, महाजन, बोरा, कांदे, भुजबळ आदी केवळ नावे आहेत. खरे काम हे गणेश गिते यांनी केव्हाच करून ठेवले होते. या सगळ्यांच्या तुलनेत शिवसेनेचे नेते मात्र कायम संभ्रमित राहिले. उदय सामंत यांच्याकडे निवडणुकीची धुरा दिली खरी; पण त्यांनी वारंवार नाशिकला येऊन तळ ठोकून शेवटी काय केले, हा प्रश्न उरतोच. सगळीकडे गितेंच्या विजयाची उघड चर्चा होत असताना सामंत यांना वा त्यांच्या शागीर्दांना काही कळलेच नाही की कळूनही वळले नाही, असे प्रश्न आता पडतात.

स्थानिक राजकारणाचे ताणेबाणे समजण्यात आणि कोणाकडून समजून घेण्यातही सामंत व शिंदेसेना कमी पडली, हे मान्य करावे लागते. गिते निवडून येताच त्यांना आपल्या पक्षात घेऊन शिंदे व सामंत यांनी अपयशाची झाकली मूठ तशीच राहील याची काळजी घेतली. ‘जो जिता वोही सिकंदर’ या उक्तीनुसार गोकुळ गिते यांचा विजय साकार झाला खरा; पण तत्पूर्वी एवढे राजकारण झाले की त्याची संगतवार कथा तयार करणेही अवघड आहे.
आमदार सुहास कांदे व मंत्री छगन भुजबळ यांचे व दराडे कुटुंबियांचे जमत नव्हते, हे सर्वश्रुत होते. कांदे व भुजबळांकडील मतांची संख्याही दोनशेच्या घरात जात होती. विरोधी पक्षांकडेही साधारण दीडशेहून अधिक मते होती. त्यामुळे या निवडणुकीची रणनीती आखताना जमिनीवरील या वास्तवाची कोणी साधी फिकीरही केलेली दिसली नाही. महायुतीच्या बागुलबुव्यामुळे सगळेच गाफिल राहिले.

हे सुरुवातीला ठीक होते; पण नंतर दराडेंसाठी माघारीचे प्रयत्न करताना सामंतांसह शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जी काही कुतरओढ झाली, त्यातून तरी काही बोध सर्वांनी घ्यायला हवा होता. दुर्दैवाने नेते तर साडेचारशेपारच्या स्वप्नात मश्गुल राहिलेच; पण उमेदवार दराडे हेदेखील ही नेत्यांच्या अस्मितेची लढाई असल्याचा आव आणत राहिले. परिणामी, जे स्थानिक काही नाजूक विषय होते, त्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. कांदे नाराज दोन गोष्टींनी होते, एकतर त्यांनी पत्नीसाठी मागितलेली उमेदवारी मिळाली नाही आणि दराडे यांनी त्यांच्यावर विश्वासही दाखविला नाही. उमेदवारालाच जर आपली गरज नाही तर कशासाठी खस्ता खा, असा विचार त्यांनी केला असल्यास नवल ते काय! सामंत यांनाही नाशिकला येताना कधीही कांदे वा भुसे यांच्याशी संपर्काची गरज वाटली नाही.

पक्षासाठी ते काहीही करून काम करतीलच, असा भ्रम कदाचित असावा. एकनाथ शिंदेंच्या हे अगदी उशिरा लक्षात आले आणि त्यांनी मग कांदेंकडे अखेरच्या क्षणी जबाबदारी दिली; पण तोपर्यंत उशीर झाला होता. मुळात, गितेंच्या उमेदवारीवरून भाजप व शिवसेनेत सुरुवातीपासून असलेला संशयकल्लोळ अखेरपर्यंत दूर झाला नाही. गिते व महाजन यांचा दोस्ताना हा जगजाहीर असल्याने गितेंच्या उमेदवारीला त्यांचाच आशीर्वाद असणार हे गृहीतच धरले गेले. त्यामुळेच शिंदेंनीही एका क्षणी दगाफटका झाला तर याद राखा, असा अप्रत्यक्ष इशारा महाजन यांना दिला होता, असे म्हणतात. ते खरे असेल तर तशाही स्थितीत गितेंचे विजयी होणे म्हणजे, आम्ही ठरविले तर काय करू शकतो, याची ही झलक असल्याचे महाजन यांनी दाखवून दिले, असेही म्हणता येऊ शकते. हे सगळं खरे असले तरी निकाल लागून उणेपुरे तीन-चार प्रहरही झाले नसताना शिंदेंचे शागीर्द येतात काय आणि आपला दारूण पराभव करणार्‍यालाच सिकंदर मानून गळ्यात गळे घालतात काय, याचे कोडे एवढे सारे लिहूनही सुटत काही नाही.

आता कोण फुटले, कोणाचे फुटले, कोणी पैसे घेतले, दराडेंनी गितेंवर आपलेच पैसे घेतल्याच्या आरोपाचे काय झाले, महाजन यांच्या या निवडणुकीतील भूमिकेचे काय, महायुतीची दोनशेहून अधिक मते फुटली ती कोणाची अशा काही प्रश्नांची उत्तरेही गितेंच्या शिवसेना प्रवेशाच्या वावटळीत हरवून गेली. राजकारणात रस असलेल्यांनी मात्र आपापल्या तर्कानुसार कोण कुठे गेले असतील याचा विचार करून वेळ घालवावा, तेवढीच घडीभरची करमणूक. नरेंद्र व किशोर दराडे बंधू तसेच त्यांचे चिरंजीव आता नेमके काय करतील, हेदेखील एक कोडे आहेच, कारण गितेंच्या शिवसेना प्रवेशाचे त्यांना काहीच वाटलेले नाही, असे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसते. ते त्यांचे प्रामाणिक मत असेल तर पराभवानंतर त्यांच्यात झालेल्या या आध्यात्मिक बदलाचे स्वागत करायला हवे. जे आपलं कधीच नव्हते त्याच्या जाण्याने शोक कशासाठी करायचा, हा एका आध्यात्मिक गुरूचा संदेश यानिमित्ताने आठवला. दराडेंसारखीच उपरती जर अनेकांना झाली तर सारा राजकीय आसमंतच सुखासीन होऊन जाईल. आमेन….
मो. ९३२५३ ८३०९२

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...