नवी दिल्ली | New Delhi
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी भगवान श्रीराम आणि महादेव यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. “शिव हे गरीबांचे दैवत, तर राम हे श्रीमंतांचे दैवत आहेत”, असे वक्तव्य रेवंत रेड्डी यांनी केले. दिल्लीतील ‘द कॉन्क्लेव्ह 2026’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी उत्तर-दक्षिण भारतातील राजकीय आणि धार्मिक संदर्भ मांडत भाजपवरही निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत धार्मिक विभाजनाचा आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले रेवंत रेड्डी?
दिल्लीत आयोजित एका खाजगी कार्यक्रमात बोलताना रेवंत रेड्डी यांनी आम्ही द्रविड आहोत आणि आमच्या स्वत:च्या परंपरा आणि रुढी आहेत, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आम्ही भगवान शिवाचे भक्त आहोत. उलट भाजपावाले स्वत:ला श्रीरामाशी अधिक जोडून घेतात. भाजपाने श्रीरामाला एक प्रकारे बळकावलं आहे. तसेच त्यांना राजकारणाचं प्रतीक बनवलं आहे. मात्र राम आमची आस्था आणि भावनेशी जोडलेले आहेत.
‘भाजपने रामाला आपलंसं केलं’
काँग्रेसला दक्षिण भारतात राजकीय यश मिळते, तर उत्तर भारतात भाजपला यश मिळते, या संदर्भातही रेवंत रेड्डी यांनी आपली भूमिका मांडली. भाजपने भगवान श्रीरामाच्या प्रतिमेचा राजकीय वापर केला, असा त्यांचा आरोप होता. उत्तर भारतातील श्रीरामाविषयीची आस्था आणि दक्षिण भारतातील शिवभक्ती यांचा संदर्भ देत त्यांनी दोन्ही भागांतील राजकीय-सांस्कृतिक फरक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी रेवंत रेड्डी यांनी श्रीराम आणि महादेव यांची तुलनाही केली. ते म्हणाले की, भगवान शिवशंकरांना नेहमी गरिबांचे दैवत मानले गेले आहे. मात्र भगवान रामाला श्रीमंताचा देव म्हणून सादर केलं जातं. भाजपा वास्तवात श्रीमंतांचा पक्ष आहे. तसेच हाच यामागचा खरा आणि सरळ राजकीय विचार आहे, अशी टीकाही रेड्डी यांनी केली.
भाजपची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काशी विश्वनाथ मंदिराबाबत असलेली श्रद्धा अधोरेखित केली. तसेच, भाजपा महादेवाची पूजा करत नाहीत या दावा खोडून काढण्यासाठी मोदींनी वेमुलावाडा येथे दिलेल्या भेटीचा उल्लेख केला. रेवंथ रेड्डी अगोदर मुस्लिम म्हणजे काँग्रेस, काँग्रेस म्हणजे मुस्लिम असे म्हणत होते ते आता प्रभू राम आणि महादेव यांच्या रेषा ओढू पाहत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कल्पना हवी की वेमुलावाडा येथे दक्षिण काशी आहे आणि भद्राचेलम येथे दक्षिण आयोध्या. त्यांनी महादेव आणि रामाच्या नावाने फूट पाडू नये, असे कुमार म्हणाले. काँग्रेस राजकीय फायद्यासाठी असे करत असल्याचे आरोप करत रेड्डींनी हिंदू धार्मिक भावना व प्रथांचे प्रादेशिक विभाजन करु नये असेही मत मांडले.
मात्र, श्रीराम आणि महादेव यांना उत्तर-दक्षिण किंवा गरीब-श्रीमंत अशा विभागणीच्या चौकटीत मांडण्याच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे.
भाजपचा रेवंत रेड्डींवर पलटवार
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते बंदी संजय कुमार यांनी रेवंत रेड्डी यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. रेवंत रेड्डी भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांच्यात राजकीय सीमारेषा आखत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तेलंगणामध्ये वेमुलवाडा येथील राजराजेश्वर मंदिराला ‘दक्षिण काशी’ आणि भद्राचलमला ‘दक्षिण अयोध्या’ म्हणून ओळखले जाते, याचा दाखला देत संजय कुमार यांनी राम आणि शिव यांची उत्तर-दक्षिण विभागणी करू नये, अशी भूमिका मांडली.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराशी असलेल्या धार्मिक संबंधांचाही दाखला दिला. त्यामुळे भाजप महादेवाची उपासना करत नाही, या रेवंत रेड्डी यांच्या प्रश्नाला भाजपने विरोध केला आहे.




