नवीन नाशिक | प्रतिनिधी
शनिवारी रात्री आदर्श सोसायटीमध्ये उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान करणाऱ्या सहा संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना कायद्याचा बालेकिल्ला दाखवला.
याप्रकरणी अमर वझरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.२७) सायंकाळी ते घरी नसताना अज्ञात व्यक्तींनी सोसायटीत उभ्या असलेल्या दोन वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. रात्री घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत,पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश नडविणकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत लक्ष्मण रमेश दांडेकर ( 23), रवी दत्ता गायकवाड (21), सचिन विजय दांडेकर ( 22), स्वप्नील सुभाष जाधव (23), संतोष गायकवाड (23) आणि मिलिंद साहेबराव कांबळे ( 25) यांना ताब्यात घेऊन अटक केली.
त्यानंतर अंबड पोलिसांनी सर्व संशयितांचा घटनास्थळी आणून नागरिकांसमोरच ‘कायद्याचा बालेकिल्ला’ उभारला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.




