थोर समाजसुधारक, महिला सक्षमीकरणाचे आद्य पुरस्कर्ते महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून नुकतेच नवचेतना अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्हा परिषद मुख्यालयात पाच एकल महिलांचा सामूहिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. महात्मा फुलेंना अशारीतीने आदरांजली वाहिली जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. फुलेंच्या नावाने राजकारण करणारे खंडीभर पुढारी राज्यात आहेत; परंतु फुलेंच्या जयंतीचे एवढे सटीक औचित्य साधण्याची संधी क्वचितच कोणी साधली असेल. ओमकार पवार यांना याबाबत दिलखुलास दाद द्यायला हवी. शासकीय अधिकार्यांनी ठरविले तर ते समाजाला कसे वळणावर आणू शकतात, हा वस्तुपाठच या घटनेने घालून दिला, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.
रूढी आणि परंपरांच्या चौकटीत पिचलेल्या एकल महिलांना सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि नव्या उमेदीने जगण्याची संधी देणारा नवचेतना अभियान हा उपक्रम पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना बळ देणारा आहे. भारतीय समाजात पतीच्या निधनानंतर किंवा विवाह विच्छेदनानंतर महिलांना ज्या सामाजिक, मानसिक व आर्थिक संघर्षाचा सामना करावा लागतो, तो केवळ भीषण असतो. आजही अनेक ठिकाणी एकल महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित तर आहेच; शिवाय त्यांच्या एकाकीपणाचा फायदा उठविण्याचा विचारही अनेकांच्या मनात शिवशिवत असतो. त्यांचे एकाकीपण, असुरक्षितता आणि सामाजिक लांच्छन यावर कुणी सहसा जाहीरपणे बोलत नाही. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार अत्यंत संवेदनशील आणि धाडसी मानला पाहिजे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या अभियानाने समाजमनात सकारात्मक परिवर्तनाची ठिणगी टाकली आहे. हे अभियान एकाएकी उभे राहिलेले नाही. सर्वप्रथम नाशिक जिल्हा परिषदेने एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात ९४ हजार एकल महिलांची नोंद झाली. असे सर्वेक्षण करणारी नाशिक जिल्हा परिषद ही पहिलीच. या उपक्रमामागे निश्चित असा विचार असल्याने अशा एकल महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना एकल महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा ठराव करायला लावले. शिवाय महिलांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करणे असे उपक्रम राबवून थेट सन्मानाची कृती केली गेली. सन्मानाने केवळ पोट भरत नाही याची जाणीव असल्याने अशा महिलांसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानाच्या महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला गेला.
एकल महिलांची नोंदणी करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करताना समुपदेशनाची देखील व्यवस्था करण्यात आली. यातून आतापावेतो १० विवाह संपन्न झाले. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीत नवचेतना अभियान कक्षाची स्थापना करण्यात येऊन त्याद्वारे एकल महिलांना नियमित रोजगार मार्गदर्शनही केले जाते. याशिवाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ जिल्ह्यातील १५ हजार पाल्यांनाही दिला जात आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार किशोर दराडे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक दिग्गज व मान्यवर विवाह सोहळ्याचे वर्हाडी म्हणून आवर्जून उपस्थित राहिले. मंत्री आणि अधिकार्यांनी केवळ उपस्थित राहून औपचारिकता पाळली नाही, तर संबळाच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशासकीय पातळीवर संवेदनशीलतेचा असा अनोखा संगम क्वचितच पाहायला मिळतो.
एकल महिलांच्या आयुष्याला केवळ लग्नापुरते मर्यादित न ठेवता प्रशासनाने त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ठोस आर्थिक स्थैर्याचा पायाही रचला आहे. या सोहळ्यात ग्रामीण भागातील महिलांच्या अपत्यांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या बचतपत्रांचे वितरण करण्यात आले. नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य खरेदी करता यावे यासाठी प्रत्येक जोडप्याला ३१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या आर्थिक मदतीमुळे या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला एक भक्कम आधार मिळाला आहे. या उपक्रमाने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला एका नव्या पर्वाची जोड दिली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या समतावादी समाजाची पायाभरणी केली, त्याच विचारांना खर्या अर्थाने पुढे नेण्याचे काम जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. सामाजिक रूढींच्या जुनाट आणि कुचकामी बेड्या तोडून महिलांना मुख्य प्रवाहात आणणे ही आजच्या काळाची गरज आहे.
मनवचेतना अभियानफ हे केवळ पाच विवाहांचा सोहळा नसून, ती एका विचारसरणीची नवी सुरुवात आहे. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी मैलाचा दगड ठरला आहे. इतर जिल्ह्यांनीही अशा प्रकारच्या उपक्रमांची प्रेरणा घेऊन एकल महिलांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला मान-सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत खरी प्रगती साधता येत नाही. या माध्यमातून ओमकार पवार व त्यांच्या टीमने घडवून आणलेला हा सामाजिक बदल निश्चितच कौतुकास्पद व महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला साजेसा असा प्रेरणादायी आदर्श आहे.




