अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी व घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे चोरटे बंद घरे, दुकाने आणि नागरिकांच्या मालमत्तेला लक्ष्य करत असताना दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यापलीकडे तपासात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या 10 महिन्यांच्या कालावधीत या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे तब्बल 221 गुन्हे दाखल झाले. मात्र, त्यापैकी केवळ 68 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्याबरोबरच तपासाचा वेग वाढविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
अहिल्यानगर शहरातील कोतवाली आणि तोफखाना ही दोन्ही पोलीस ठाणे अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक मानली जातात. शहराचा मध्यवर्ती भाग, प्रमुख बाजारपेठा, व्यापारी आस्थापना आणि मोठ्या लोकवस्तीचा परिसर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतो. त्यामुळे या दोन्ही ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांसह तपास पथकावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे. मात्र, अलीकडील काळात चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी आणि जबरी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे दिवाळी सणाच्या काळातच चोरट्यांनी आपले जाळे पसरविल्याचे दिसते. सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, कल्याण रोड, सारसनगर यांसारख्या शहरातील विविध भागांत चोरीच्या घटनांची भीती नागरिकांना सतावत आहे. घर बंद करून बाहेरगावी जाणेही सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
चोरीच्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर परिस्थिती अधिक स्पष्ट होते. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 महिन्यांत चोरीचे 126 गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी केवळ 37 गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 95 चोरीचे गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी 31 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. घरफोड्यांच्या घटनाही चिंताजनक आहेत. कोतवाली हद्दीत 26 घरफोड्यांची नोंद झाली असून, त्यापैकी 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. तोफखाना हद्दीत 19 घरफोड्या झाल्या असून, केवळ पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. विशेष म्हणजे घरफोडीच्या एकूण 45 गुन्ह्यांपैकी 16 गुन्हे उघडकीस आले असून, 29 गुन्ह्यांचा तपास बाकी आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरातील ऐवज चोरीला गेल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.




