मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
शिर्डी विमानतळ परिसरात उभारण्यात येणार्या पंचतारांकित हॉटेलमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. तसेच विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणार्या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.
शिर्डी विमानतळ परिसरातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने पंचतारांकित हॉटेल विकसित करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला.
ताज समूहासारख्या नामांकित हॉटेल उद्योगसमूहाच्या सहभागामुळे शिर्डी विमानतळासह परिसराच्या विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनवाढीसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीलाही हातभार लागेल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला आणि परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याने शिर्डी विमानतळाच्या कामालाही अधिक गती द्यावी, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लि, ताज समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.




