Thursday, November 19, 2026
HomeनगरAhilyanagar : चार्‍याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Ahilyanagar : चार्‍याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

रब्बीची पेरणी अवघी 14 टक्के || ज्वारीसोबत गहू, हरभरा पिकाचे क्षेत्र घटणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदा दुष्काळी स्थितीमुळे आणि परतीच्या पावसाअभावी रब्बी हंगामाच्या पेरणीला मोठा फटका बसला आहे. पेरणी योग्य पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली नाही. परिणामी, शेतकर्‍यांना पेरणी करता आलेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 14 टक्केच पेरणी पूर्ण झाली असून, शेतीचे अर्थकारण संकटात सापडले आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्यासह चार्‍याची स्थिती बिकट होणार असल्याचे चिन्हे आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र चार लाख 49 हजार 667 हेक्टर आहे. मात्र, आतापर्यंत प्रत्यक्षात केवळ 63 हजार 758 हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरवर्षी परतीच्या पावसानंतर जमिनीत ओल निर्माण झाल्यावर शेतकरी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांची पेरणी करतात. यंदा मात्र पावसाने साथ न दिल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी रखडली आहे. गेल्या काही वर्षांत गहू, हरभर्‍याच्या लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. मात्र, पेरणीच्या काळात पाऊस न झाल्याने यंदा हरभर्‍याचे क्षेत्रही प्रभावित झाले आहे. जमिनीत ओल असल्यास अथवा शेती ओलावून त्यात हरभरा पेरणी केल्यास अवघ्या दोन ते तीन पाण्यात पिक येणार्‍या यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र घटतांना दिसत आहे.

जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र एक लाख 62 हजार 909 हेक्टर असून, आतापर्यंत केवळ 39 हजार 944 हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे ज्वारीपासून मिळणार्‍या कडब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता असून, आगामी काळात पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र एक लाख 28 हजार 462 हेक्टर असून, आतापर्यंत तीन हजार 363 हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभारा सरासरी क्षेत्र एक लाख आठ हजार 345 हेक्टर असताना 9 हजार 9 हेक्टरवरच पेरणी झाली आहे. करडईचे सरासरी क्षेत्र 197 हेक्टर असून आतापर्यंत 10.2 हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका पिकाचे सरासरी क्षेत्र 48 हजार 281 हेक्टर असून आतापर्यत 10 हजार 459 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

नव्याने ऊसाची लागवड एक हजार 376 हेक्टरवर झाली आहे. त्यासाठी सरासरी क्षेत्र 94 हजार 693 हेक्टर क्षेत्र आहे. ज्या भागात पाण्याची व्यवस्था आहे. अशा शेतकर्यांनी रब्बीची पेरणी करण्याचे धाडस केले आहे. उर्वरित शेतकर्यांनी पाणी नसल्याने बियाणे खरेदीचा प्रयत्न देखील केला नाही. कोरडवाहू क्षेत्रात ओलीअभावी पेरणी झालेली नाही. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्यांनी जमीन भिजवून पेरणी केली आहे. या पिकांची उगवण झाली असून, ती जगविण्यासाठी स्प्रिंक्लद्वारे पिकांना पाणी दिले जात आहे.

ताज्या बातम्या

AMC : पाणी कपात नकोच; आधी गळती रोखा, वितरण सुधारा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरात कोणतीही पाणी कपात करू नका, अशी एकमुखी मागणी सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी (18 नोव्हेंबर) मनपात झालेल्या पाणी कपात...