सोनई |वार्ताहर| Sonai
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या सुविधातून परिसराचा विकास व आध्यात्मिक पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करतानाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थानने भाविकांच्या सुविधांसाठी आपआपसात सामंजस्य करार करावा, अशी सूचना केली.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त मंजूर रस्ते व पूल कामांची सुरुवात मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते शनिशिंगणापूर येथे बोलत होते. आ. विठ्ठलराव लंघे, नगराध्यक्ष करणसिंह घुले, देवस्थानचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने नाशिकला येणारे भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथेही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतील. दोन्ही देवस्थाने जागतिक स्तरावरची असल्याने भाविकांच्या सुविधेसाठी शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थानने आपापसांत सामंजस्य करार करावा आणि सर्व आवश्यक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करावी. समृद्धी महामार्ग व शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला निधी उपलब्ध झाल्याने आध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूरकडे येणार्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा व लहान पुलाच्या बांधकामासाठी 59 कोटी 40 लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या आदेशानुसार या कामांना मंजुरी देण्यात आली असून, सार्वजनिक बांधकामअंतर्गत रोहयो (कार्य) विभागामार्फत ही कामे केली जाणार आहेत.
खरीप आवर्तनाचा 30 हजार हेक्टरला लाभ
खरीप आवर्तनाचे योग्य नियोजन झाल्यामुळे 30 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. आगामी रब्बी हंगामासाठी 150 बंधारे भरून देण्याचे नियोजन करण्यात आले असून, शिंगवे तुकाई योजनेचे सर्वेक्षण दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. आम. लंघे यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या अंतर्गत सुविधा व वाहनतळासाठी निधी उपलब्ध झाल्याची माहिती दिली.




