अहिल्यानगर / श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा (डिलिमिटेशन) प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय नकाशात मोठी उलथापालथ होणार आहे. या प्रक्रियेत जिल्ह्याला तिसरा लोकसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता वाढली असून, उत्तर भागात स्वतंत्र मतदारसंघ झाल्यास ‘श्रीरामपूर’चे नाव केंद्रस्थानी आले आहे. या बदलांमुळे आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची संपूर्ण राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.सध्या राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पुनर्रचनेबाबत सध्या दोन प्रमुख शक्यता चर्चेत आहेत. 50 टक्के वाढीचे सूत्र लागू झाल्यास राज्यात 24 जागांची भर पडून एकूण संख्या 72 वर पोहोचू शकते.
जनगणनेचा निकषानुसार 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्या पूर्णपणे विचारात घेतल्यास महाराष्ट्रातील जागांची संख्या 79 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या शहरी भागांसह ग्रामीण जिल्ह्यांतील मतदारसंघांच्या सीमांमध्ये मोठे फेरबदल होतील. जिल्ह्याचा राजकीय विस्तार आणि महिला आरक्षणसध्या अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व शिर्डी आणि अहिल्यानगर दक्षिण या दोन मतदारसंघांत विभागलेले आहे. लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेता श्रीरामपूर हे तिसर्या मतदारसंघाचे महत्त्वाचे केंद्र ठरू शकते.
यासोबतच जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2 नव्या मतदारसंघांची भर पडून ही संख्या 14 वर जाण्याची शक्यता आहे.तसेच, लोकसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू झाल्यास राज्यातील 72 जागांपैकी सुमारे 24 जागा महिलांसाठी राखीव होतील. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य तीनपैकी एका मतदारसंघावर महिला प्रतिनिधित्वाची संधी मिळू शकते, ज्यामुळे राजकीय पक्षांना आतापासूनच महिला नेतृत्वाला बळ द्यावे लागणार आहे.
अंतिम अधिसूचनेनंतरच !
अहिल्यानगरला तिसरा खासदार मिळणार का, श्रीरामपूर स्वतंत्र मतदारसंघ होणार का आणि विधानसभेच्या दोन जागा वाढणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, केंद्र सरकारचा अधिकृत प्रस्ताव आणि अंतिम अधिसूचना येईपर्यंत या सर्व बाबी चर्चेच्या पातळीवरच राहणार आहेत.




