राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
चार जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करून फायटर, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी शहरात घडली. सुदर्शन गंगाधर हिवाळे (वय 22, रा. कोंढवड, ता. राहुरी) या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सुदर्शन हिवाळे याचा मित्र कृष्णा दिलीप म्हसे आणि राहुल गोरक्षनाथ खिलारी यांच्यात व्यवहारावरून वाद झाला होता. त्यावेळी सुदर्शन हिवाळे याने मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटविला होता.
दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुदर्शन हिवाळे हा नातेवाईकाच्या लग्नासाठी राहुरी शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात गेला होता. त्यावेळी राहुल खिलारी याने त्याला फोन करून शिवीगाळ केली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लग्नसमारंभ आटोपल्यानंतर सुदर्शन हा मंगल कार्यालयाबाहेरील पार्किंगमध्ये मोटारसायकलजवळ थांबला असताना आरोपी तेथे आले. त्यांनी सुदर्शनला शिवीगाळ करून फायटर, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा आमच्या नादी लागला तर जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली.
सुदर्शन हिवाळे याच्या फिर्यादीवरून राहुल गोरक्षनाथ खिलारी, आदित्य अनिल गुंजाळ, विशाल म्हसे (तिघे रा. शिलेगाव, ता. राहुरी) व गणेश वाघ या चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1336/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 352, 324(4), 3(5) प्रमाणे मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




