Thursday, July 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : ट्रॅफिक पार्कचा अपमृत्यू

पडसाद : ट्रॅफिक पार्कचा अपमृत्यू

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

नाशिकमध्ये आणखी एका चांगल्या उपक्रमाचा अपमृत्यू होऊ घातला आहे. निओ मेट्रो व आयटी पार्क या महायुतीच्याच स्वप्नातील प्रकल्पांचा तर गर्भपात झाला आहेच. द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपूल, नाशिक-मुंबई रेल्वे, विद्यापीठाचे उपकेंद्र, इंडस्ट्रीयल कॉरिडॉर तसेच राज्य सरकारनेच जाहीर केलेले विविध लस्टर्स अशी अपमृत्यू झालेल्या अनेक घोषित योजनांची यादी बरीच वाढविता येईल. साधे पालकमंत्रिपदही नाशिकच्या वाट्याला येऊ नये, एवढी उपेक्षा नाशिकच्या भाळी लिहिली जाणे हे कोणत्या जन्मीचे पाप, असे आता म्हणावेसे वाटते. गर्भपाताच्या या मालिकेमुळे विकासाच्या सुवर्ण त्रिकोणातून नाशिक केव्हाच बाहेर फेकले गेले आहे.

नाशिकची ही जागा दुष्काळ पाचवीला पुजलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरने घेऊन टाकली आहे. सिंहस्थामुळे नाशिकच्या नशिबी जे काही पुण्य दिसते आहे, त्यालाही यंदा ग्रहण लागले असून सध्या विकासकामांचा नाशकात जो काही विचका झालेला दिसतो आहे, त्यामागे ही नाशिकची घोर उपेक्षाच असल्याबद्दल तीळमात्र शंका नाही. हे सारे नाशिककरांना दिसते, जाणवते पण खुपत नाही, ही खरी शोकांतिका आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत सातत्याने नाशिकची कोंडी झाल्याचे दिसतेय, तरी नाशिककरांची ब्रह्मानंदी लागलेली टाळी काही केल्या दूर व्हायला तयार नाही. या उपेक्षेबद्दल कोणाला तरी जाब विचारावा असे एकाही नाशिककराला कधी वाटले नाही. सगळं काही सुशेगात असल्यासारखं चालू आहे. त्यामुळेच गेली अकरा वर्षे नाशिककरांना वाहतूक साक्षर करण्याचे असिधारा व्रत घेतलेल्या ट्रॅफिक एज्युकेशन पार्कच्या होऊ घातलेल्या अपमृत्यूचेदेखील नाशिककरांना काहीही वाटणार नाही.

गेले पंधरा दिवस या उपक्रमाविषयी माध्यमांमध्ये बरीच चर्चा चालू असतानाही या पार्कचा लाभ घेणार्‍या लक्षावधींपैकी एकानेही पुढे येऊन हा उपक्रम नाशिकच्या भावी पिढीच्या भल्यासाठी येथेच असायला हवा, अशी भूमिका घेतलेली नाही. हे अपेक्षित होतेच; परंतु किमान हा प्रकार माहीत करून घ्यावा, एवढीही संवेदनशीलता वा सजगता आपल्यामध्ये नसेल तर अवघड आहे. औद्योगिक वर्तुळातील काही सजग नाशिककरांनी ट्रॅफिक एज्युकेशन पार्कची मुहूर्तमेढ रोवली, त्यालाही आता जमाना झाला. उद्योगांच्या आर्थिक मदतीने हे लोकशिक्षणाचे काम अत्यंत उत्तम चालले होते. नाशिकच्या परिवहन विभागाने तर अधिकृत एजन्सी म्हणून या संस्थेला महत्त्व दिले होते. संस्थेचे सर्वात महत्त्वाचे आणि पुढील पिढीच्या दृष्टीने अत्यंत योग्य असे काम म्हणजे शाळा-शाळांमधील मुलांना वाहतूक नियमांचे नियमित धडे देणे. हा पार्क वाहतूक नियमांच्या शिक्षणासाठी सर्व अत्याधुनिक साधनसामग्रीने परिपूर्ण आहे.

महाराष्ट्रात केवळ दोनच ठिकाणी अशी वाहतूक साक्षरतेची सुविधा आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक महापौर परिषद कोची (पूर्वीचे कोचिन) येथे भरली असताना नाशिकचे तत्कालीन महापौर बाळासाहेब सानप यांच्यासोबत परिषदेला जाण्याचा योग आला होता. तेव्हा कोची महापालिकेने उभारलेल्या ट्रॅफिक एज्युकेशन पार्कला खास भेट दिली होती. तत्कालीन शहर अभियंता सुनील खुने यांनी तेव्हाच असाच पार्क आपण नाशिकला उभारूया, असे सांगितले होते. सुदैवाने नंतर नाशिकमधील काही मंडळींनी ही कल्पना मांडली तेव्हा तत्कालीन पदाधिकारी व अधिकार्‍यांनी त्याला लागलीच मान्यताही दिली. पार्क सुरू तर झाले; पण पैशाचे सोंग काही करता येईना. त्यासाठी मग काही औद्योगिक घराणी पुढे आली. एका परदेशी कंपनीनेही मदत केली. सगळं काही उत्तम चाललं असतानाच त्याला नजर लागली. पार्कमध्ये फिरायला येऊ देत नाही, अशी तक्रार सुरू झाली.

लोकांच्या अशा गार्‍हाण्यांना किती महत्त्व द्यायचे हे राजकारण्यांना नेमके समजते. लागलीच त्यांनी यात लक्ष घातले. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिल्यानंतर प्रकरण चिघळले. बघता बघता ही संस्था म्हणजे जणू काही समाजद्रोही असल्यासारखे वर्तन सुरू झाले. नगरसेवकांच्या शब्दाला किंमत असल्याने अधिकार्‍यांनीही नोटिसांचा धडाका लावला. नियमित भाडे भरत असताना रेडीरेकनरनुसार नोटिसा आल्यानंतर हे समाजकार्य कसे रेटायचे असा विचार पुढे आला. भाड्याबाबत पुनर्विचार करण्याबाबत विनंती अर्ज केले गेले. पालिकेच्या महानगरातील असंख्य मालमत्ता ओस पडलेल्या असताना, अनेक ठिकाणी केवळ बेकायदा धंद्याचे अड्डे चाललेले असताना आणि अनेक समाजमंदिरे, उद्याने ही काही दांडग्यांची कौटुंबिक प्रॉपर्टी बनून गेली असताना व त्याकडे ढुंकूनही पाहण्याची तसदी कोणी घेत नसताना उत्तम समाजकार्य करणार्‍या या संस्थेला मात्र आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले गेले आहे.

पालिकेच्या गेल्या महासभेत तर संस्थेवर मनसोक्त तोंडसुख घेतले गेले. हे सगळं ऐकून, पाहून हेचि फल काय आम्हा तपाला, असा विचार हा पार्क चालविणार्‍यांच्या मनात आला असणार. आता तर जे काही झालं ते पुरे, असा विचार करून ही मंडळी तेथून बाहेर पडण्याच्या तयारीला लागली असल्याचे कळते. पालिकेतील काही नगरसेवक, आसपासची काही मंडळी यांच्या मनासारखे सारे काही होत असल्याने भविष्यात हा पार्क त्याचे लोकशिक्षणाचे नियमित काम करणार की कोणाच्या तरी अहंकाराची प्रॉपर्टी होऊन बसणार, हे पाहावे लागेल.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : प्रेमसंबंधातून महिलेचा खून; वाडीवऱ्हे पोलिसांनी १४ दिवसांत...

0
घोटी | वार्ताहर |Ghoti वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या (Wadivarhe Police Station) हद्दीतील एसएमबीटी (SMBT) मेडिकल कॉलेजबाहेर बेवारस अवस्थेत आढळलेल्या एका महिलेच्या मृत्यूच्या (Woman Death) प्रकरणाचा छडा...