Thursday, April 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : महायुतीच्या चक्रव्यूव्हात मविआची फसगत

राज-का-रण : महायुतीच्या चक्रव्यूव्हात मविआची फसगत

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

- Advertisement -

महायुतीतील घटक पक्षांनी आपापसातील संघर्षाचा असा काही बागुलबोवा उभा केलाय की त्यात महाविकास आघाडीतील सारेच पक्ष बिनचेहर्‍याचे झाले, हे या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. यातील निकालावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच महापालिकेच्या निवडणुकीचे राजकारण अवलंबून राहील.

नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उद्या सोमवारी सायंकाळी संपेल. जिल्ह्यातील अकरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कौल बुधवारी दुपारपर्यंत लागेल. काही महिन्यांपूर्वी महायुतीविरोधात महाविकास आघाडी यांचा जोरदार संघर्ष होईल, असे वाटत होते. पुढे या दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांतच अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू झाली आणि प्रत्येकाला आपापली रेषा मोठी करायची असल्याने सगळेच एकमेकांविरोधात लढण्यासाठी सिद्ध झाले. प्रत्यक्ष निवडणुकीत सध्या त्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांमध्ये सध्या जो राडा सुरू आहे, त्याच्या भाऊगर्दीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष दिसेनासे झाले आहेत.

महायुतीतील घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा सारा अवकाश व्यापल्याने त्यांचे विरोधक शोधावे लागत आहेत. अनेक ठिकाणी शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेस यांच्या उमेदवारांचा मागमूसही दिसत नाही. नाशिक जिल्ह्यासारख्या ठिकाणी एकेकाळी शिवसेना अग्रेसर असायची. परंतु शिवसेनेची शकले झाल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच दुसर्‍या ठाकरेंची मनसेही कुठे मैदानात दिसत नाही. काँग्रेस तर हद्दपार झालेली आहेच, पण शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या राष्ट्रवादीला टेकायलाही जागा राहिलेली नाही, असे दिसते आहे. साहजिकच या निवडणुकीचा काहीही निकाल लागला तरी विजय हा आपलाच असे महायुती नंतर म्हणू शकते. सिन्नर वगळता इतरत्र आघाडीच्या घटक पक्षांनी आशा धरावी अशी स्थिती नाही.

राज्यात सर्वत्र महायुतीतील घटक पक्षांमधील लढतींचीच चर्चा सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये तर दोन पक्षांमध्ये असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मंत्री व आमदार असलेल्या दोन सुपुत्रांमध्येच तुंबळ चकमक सुरू झालेली पाहायला मिळत आहे. तिकडे मराठवाडा, खान्देश व विदर्भातही काही ठिकाणी भाजप व शिंदेंची शिवसेना यांच्यात थेट सामना आहे. काही ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी व भाजप व शिवसेना अशीही लढाई दिसते आहे. सत्तारूढ युतीतील या घटक पक्षांमधील संघर्ष काही ठिकाणी टोकाला गेलेला दिसतो आहे.

सत्तारूढ पक्षात असल्याचे तारतम्यही अनेकांनी सोडून दिले असून एकमेकांचा उद्धार करण्यातही ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. एकूणच वातावरण असे आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या गोंगाटात विरोधी महाविकास आघाडीचे घटक पक्ष हरवून गेलेले दिसतात. ही स्थिती प्रासंगिक की ठरवून केलेली एक अफलातून राजकीय तडजोड याचा अंदाज लगेचच कदाचित लागणार नाही. परंतु एकूण परिस्थिती पाहता ज्या आक्रमक पद्धतीने युतीतील पक्ष एकमेकांवर तुटून पडत आहेत आणि ज्येष्ठ नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार हे तिघेही त्यात गांभीर्याने न पडता पुढे जात आहेत, ते पाहता त्यांनी हे ठरवून चालविले आहे, असा संशय बळावतो.

आपापसातच अशी लढाई करायची की विरोधकांना त्यात जागा मिळता कामा नये व तसा प्रयत्न त्यांनी केला तरी यश मिळण्याची शयता राहणार नाही, असा चक्रव्यूह टाकला गेलेला दिसतो आहे. उद्या निकाल लागला तर ‘चीत भी हमारी अन् पट भी’, असे म्हणायला हे तिघेही पुन्हा मोकळे होतील असे दिसते. महायुतीतील तीन प्रमुख पक्षांसह त्यांचे दुसर्‍या वा तिसर्‍या आघाडीचे नेतेही प्रचारात दंग आहेत. राज्यांचे दौरे करीत आहेत. त्या तुलनेत उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे आदी नेते कुठेही प्रचारात दिसत नाहीत. संगमनेरात बाळासाहेब थोरातांना भाचेसुनेसाठी अडकून पडावे लागले आहे. आमदारकी गेलीच आता नगरपरिषदेचीही सत्ता राखण्याचे मोठेच आव्हान उभे ठाकल्याने त्यांना बाहेर पडणे अशय झाले आहे. हीच गत त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांचीही दिसते आहे. ठाकरेंचे फायरब्रँड प्रवक्ते संजय राऊत यांच्या आजारपणामुळे आधीच उबाठा लंगडी झाली आहे.

दुसर्‍या जहाँबाज नेत्या सुषमा अंधारे फिरत आहेत, पण त्यांना फारशी मोकळीक दिलेली दिसत नाही. काँग्रेसचे तर स्थानिक नेतेही घराबाहेर पडायला जेथे तयार नाहीत, तेथे राज्यस्तरीय नेत्यांची गोष्टच वेगळी. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंडळीही एवढी गळाठली कशी, हा प्रश्न अनेकांना सतावतो आहे. जणू विरोधकांनी महायुतीला बाय दिल्यासारखे सगळे चालले आहे. वेगळ्या अर्थाने ‘तुम लडो, हम कपडे संभालते है’, सारखाच मामला.

जे दिल्लीत तेच गल्लीत, या उक्तीनुसार राज्यात विरोधकांची जी स्थिती दिसते आहे तीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक चिंताजनक अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात अकरा नगरपरिषदा वा पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सुषमा अंधारे यांची एक जाहीर सभा वगळता विरोधी आघाडीचा एकही नेता संपूर्ण जिल्ह्यात प्रचारासाठी आलेला नाही. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे आदींनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी किल्ला लढविला. शिवसेना उबाठाचे उपनेते दत्ता गायकवाड हे आजारी असल्याने संपूर्ण संघटनाही जणू अशक्त झाल्यासारखी झाली आहे.

माजी आमदार वसंत गिते यांनी सिन्नरमध्ये सभा जरूर घेतली; पण उर्वरित कोणीही गावागावांमध्ये फिरण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. खासदार राजाभाऊ वाजे सिन्नर या आपल्या होमपिचमध्ये अडकून पडलेले आहेत. राशपचे खासदार भास्कर भगरे यांची तर कोणाचा कुठे प्रचार करावा, अशी पंचाईत झाल्याने ते गप्पगार आहेत. त्यांच्या पिंपळगाव बसवंतमध्ये त्यांचा पक्ष औषधालाही सापडत नाही. काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव या आपल्या खासदारकीतच मश्गुल असल्याने त्यांना पक्षाच्या लोकांसाठी वेळच मिळत नसावा, असे दिसते. माजी आमदार अनिल कदम यांचीही पिंपळगावबरोबरच ओझर या त्यांच्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा कसोटी लागली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय व दीपिका चव्हाण या दाम्पत्याने दोनदा आमदारकी व पालिकेतही सत्ता भूषविली, अशा सटाण्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने माघार घ्यावी व नगरसेवकपदासाठीही माणसं मिळू नये ही वेळ ओढवली आहे. सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे यांच्याकडे पालिकेची सत्ता होती. त्यामुळे त्यांना ती राखण्यासाठी गावातच अडकून पडावे लागले आहे. तीच गत मंत्री माणिकराव कोकाटे यांची असली तरी त्यांनी गावात फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. भाजपने यंदा प्रथमच स्वबळ आजमावताना दोन्हीही मित्रांना दूर सारल्याने येथील लढत कमालीची रंगतदार ठरली आहे.

पिंपळगाव बसवंतमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भास्करराव बनकर व आमदार दिलीप बनकर यांनीच एक होऊन गावाला दिलेल्या धक्क्यातून अजूनही अनेक जण सावरलेले नाहीत. गेली अनेक वर्षे भास्करराव बनकर यांनी स्थानिक सत्तेवर भक्कम मांड टिकवून ठेवली आहे. आता आमदार गटही बरोबर आल्याने खरे तर मतांचा गुणाकार व्हायला हवा. पण राजकारणात दोन अधिक दोन बरोबर नेहमीच चार होतीलच असे नाही, कधी ते पाचही होतील अन् कधी ते दोनच राहतील. पिंपळगावमध्ये नेमकी हीच चर्चा सध्या सुरू आहे. जुनेजाणते, मातब्बर बनकरांकडे तर तरुणांचा सळसळता उत्साह, चैतन्य भाजपचे सतीश मोरे यांच्याबरोबर अशी ही लढाई तेथे रंगलेली आहे. भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादी यांच्यातील ही लढाई सध्या तरी काट्याची ठरू पाहते आहे.

नजीकच्या चांदवडमध्ये माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरात झालेली खळबळ अद्याप शमलेली नाही. आयुष्यभर ज्यांच्याशी उभा दावा मांडला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता प्रचारासाठी जीवाचे रान करायला लागत असल्याचे चित्र चांदवडवासीयांनाही अस्वस्थ करणारे आहे. त्याचा मतदानावर कसा परिणाम होतो, यावर तेथील निकाल अवलंबून राहील. त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपविरोधात शिंदे गट अशी तर भगूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने समस्त विरोधी पक्षांना सोबत घेऊन आव्हान दिले आहे.
भारतीय जनता पक्ष सटाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पिंपळगाव बसवंत, ओझऱ, चांदवड, सिन्नर व नांदगाव अशा आठ ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे. शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादीही तेवढ्याच ठिकाणी लढत असली तरी काही ठिकाणी हे गळ्यात गळे घालताना तर काही ठिकाणी एकमेकांचे गळे कापतानाही दिसत आहे.

शिंदेंची शिवसेना सटाणा, त्र्यंबकेश्वर, येवला, इगतपुरी, मनमाड, भगूर, ओझऱ व सिन्नर या ठिकाणी तर राष्ट्रवादी येवला, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, भगूर, पिंपळगाव बसवंत, ओझर, चांदवड व सिन्नर येथे नगराध्यपदासाठी रिंगणात आहेत. उबाठा इगतपुरी, मनमाड, ओझऱ, चांदवड व सिन्नरमध्ये तर काँग्रेस त्र्यंबकेश्वर, पिंपळगाव बसवंत व ओझऱ अशा केवळ तीन ठिकाणी लढती देत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट मात्र अस्तित्वहीन आहे. येवल्यात छगन भुजबळांच्या साम्राज्याला शिंदेंच्या शिवसेनेने आव्हान दिले आहे. भुजबळ प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नसल्याने सारी मदार माजी खासदार समीर भुजबळ व कुटुंबियांवर पडली आहे. माजी आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे या बंधूंना भुजबळांचे स्थानिक विरोधक शरद पवारांचे विधानसभेचे उमेदवार माणिकराव शिंदेंचीही मदत लाभली आहे.

भुजबळांना प्रथमच भाजप जोडीला आहे. राजकारणाचे फासे असे सगळीकडेच उलटे पडल्याने लढती रंगतदार ठरत आहेत. नांदगाव व मनमाडमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या दृष्टीने मोकळे रान असले तरी त्यांना तेथे रोखण्यासाठी माजी आमदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांनी प्रयत्न चालविले आहेत. नांदगावमध्ये तर सात नगरसेवक बिनविरोध निवडून आणून कांदेंनी आपल्या प्रभुत्वाची झलक दाखविली आहेच. भगूरमध्ये शिवसेनेचे विजय करंजकर व आमदार सरोज अहिरे यांच्यातील संघर्षाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. सटाण्यात भाजपने आपल्याच जुन्या, निष्ठावानांकडे पाठ फिरविल्याने मोठेच बंड झाले असून या सर्वच नाकारलेल्यांनी स्वतंत्रपणे आपल्याच पक्षाला आव्हान दिले आहे. शिवसेनेने भाजपमधील या अंतर्गत सुंदोपसुंदीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न चालविला आहे. तो कितपत यशस्वी होतो ते पाहावयाचे. असेच काहीसे त्र्यंबकेश्वरमध्येही झालेले दिसते. उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या त्रिवेणी तुंगार-सोनवणे यांना शिवसेनेने थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी बहाल करून चांगलीच आघाडी घेतली आहे.

महायुतीतील घटक पक्षांनी आपापसातील संघर्षाचा असा काही बागुलबोवा उभा केलाय की त्यात महाविकास आघाडीतील सारेच पक्ष बिनचेहर्‍याचे झाले, हे या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. यातील निकालावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच महापालिकेच्या निवडणुकीचे राजकारण अवलंबून राहील. आपापसातील नुरा कुस्तीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसले तर आगामी लढतीही अशाच झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांना नवे डावपेच लढावे लागतील. अर्थात, त्यांना तसे भान आले तर..

ताज्या बातम्या

Sangamner : विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा कलावंतांवर हल्ला

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत, इतरांना बोलावून घेत कलावंतांना बेदम मारहाण...