नाशिक | Nashik
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) निर्माण झालेल्या गिते प्रकरणाचा (Gite Case) तोडगा मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) काढतील, असा विश्वास शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. तसेच महाजन यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून ते गणेश गिते व गोकुळ गिते यांना समजावून सांगतील आणि अर्ज मागे घेण्याबाबत चर्चा करतील, असेही त्यांनी म्हटले. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे, किशोर दराडे, उपमहापौर विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीबाबत (Vidhan Parishad Election) महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांच्यात उमेदवारी संदर्भात संवाद झाला असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षाही मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. तसेच गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गणेश गिते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घडवून आणली जाईल. त्यानंतर गिते माघार घेतील, असा विश्वास आहे. त्यासाठी निवडणुकी संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीची समन्वय समिती सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Sanjay Raut : “शिंदे गट पहिला क्रमांकाचा शत्रू, आमच्याकडील मते…”; राऊतांचे नाशिकमध्ये विधानपरिषदेच्या मतदानाबाबत मोठे वक्तव्य
तसेच गणेश गिते (Ganesh Gite) यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन याचिकेबाबत प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले की, विरोधकांकडून हा ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवला जात आहे, असा आरोपही केला. तसेच विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याच्या ठाकरे गटाच्या आरोपांवर बोलतांना “जर असा आरोप केला जात असेल तर संबंधित पक्षाने राज्यभरातील आपल्या उमेदवारांची माघार घ्यावी, असा टोलाही मंत्री सामंत यांनी लगावला.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : महायुतीतच बंडखोरीचे सावट; ‘दराडे-गिते’ लढत होणार की, निवडणूक बिनविरोध?
नाशिक विधानपरिषदेची जागा शिवसेनेला (Shivsena) सुटल्यानंतर भाजपचे पदाधिकारी गणेश गिते यांनी पक्षाच्या आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत.याशिवाय त्यांचे बंधू गोकुळ गिते (Gokul Gite) यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. गणेश गिते निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याने हे आव्हान सोडविण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आली आहे.त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारीच्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, महायुतीतील समन्वय आणि गिते बंधूंची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




