भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara | Kotul
नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटात आद्रा आणि पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव केल्यानंतर काल या सरींनी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणांकडे येणारी पाण्याची आवक मंदावली आहे. लाभक्षेत्रातही काल कुठेही पाऊस झाल्याचे वृत्त नाही. गत सहा दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने पेरण्या झालेली पिके तरारली आहेत. तर पावसाने उसंत घेतल्याने उर्वरित पेरण्यांना वेग येणार आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरण पाणीसाठा 6664 दलघफू झाला आहे. निळवंडेचा पाणीसाठा 2872 दलघफू (34.46 टक्के) झाला आहे.
वाकीचा 5310 क्युसेकपर्यंत असलेला विसर्ग आता 556 क्युसेकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे निळवंडेतही हळूवार आवक होत आहे. दरम्यान, गत तीन दिवसांत धो धो पाऊस झाल्याने पाणलोटात मोठ्या प्रमाणात भात रोपे व बांधांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. इतरही नुकसान आहे. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत. सोमवारी आणि मंगळवारी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. काही ठिकाणी दैवाच्या भरवशावर पेरण्या केल्या होत्या. पण या पावसाने शेतकर्याला दिलासा दिला आहे. बर्याच महसूल मंडळात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी पेरणी कामाला लागला आहे. धरणांमध्येही पाणीसाठा समाधानकारक असल्याने शेतकरी शेती कामाला जुंपला आहे.
आढळात 74 टक्के पाणीसाठा
गत तीन दिवसांपासून आढळा पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने आढळा धरणात झपाट्याने वाढ झाली. 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 780 दलघफू (73.58 टक्के) पाणीसाठा झाला होता. काल पाणलोटात पाऊस नसल्याने आवक कमालीची मंदावली आहे.
घोड निम्मे भरले
दक्षिण नगर जिल्ह्याला फायदेशीर असलेल्या घोड धरण गत तीन दिवसात निम्मे भरले आहे. आठ दिवसांपूर्वी या धरणातील पाणीसाठा मायनस होता. पण तीन दिवसात या धरणात जोरदार आवक झाली. त्यामुळे काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 3592 (51 टक्के)दलघफू झाला होता.




