Tuesday, September 29, 2026
HomeनगरSangamner : संगमनेर तालुक्यात चार महिन्यांत 31 जणांना सर्पदंश

Sangamner : संगमनेर तालुक्यात चार महिन्यांत 31 जणांना सर्पदंश

पावसाळ्यात अधिक प्रमाण || 165 लसींचा साठा उपलब्ध

संगमनेर | Sangamner

तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही सर्पांचा संचार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यातच विषारी सर्प चावल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर लगेचच काहीतरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मुख्यतः पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक असतो. त्यावरुन तालुक्यात एप्रिल ते जुलैपर्यंत तब्बल 31 जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आत्तापर्यंत दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

- Advertisement -

देशभरात सुमारे 369 सर्पांच्या प्रजाती आहेत. यापैकी 50 सर्प जमीन आणि पाण्यात राहणारे आणि 19 फक्त पाण्यातच सापडतात. महाराष्ट्रात 52 जातींचे सर्प सापडतात, त्यापैकी 12 विषारी आहेत. यातील उरलेले बिनविषारी, निम्नविषारी आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात 27 जातींचे सर्प सापडतात. त्यापैकी मण्यार, नाग, फुरसे, घोणस, सर्पटोळी किंवा चापडा, कोवळा हे साप विषारी वर्गातील असून संगमनेर तालुक्यातही त्यांचा आढळ आहे. विशेषतः पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. पावसाळा सुरू झाला की मानवी वस्ती परिसरात सर्प आढळण्याचे प्रमाण वाढते. विशेष म्हणजे बर्‍याच जातींच्या सर्पांच्या प्रजननाचा हा काळ असतो.

याशिवाय सर्प राहत असलेल्या बिळांमध्ये पावसाचे पाणी साचते, त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात सर्प मानवी वस्ती परिसरात आढळून येतात. सर्पांबद्दल असलेल्या अनेक गैरसमजांतून त्यांना मारण्याचे प्रकार घडतात किंवा सर्पदंश झालेल्या व्यक्ती देखील घाबरुन मृत्यूमुखी पडतात. तालुक्यात एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांत 31 जणांना सर्पदंश झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर दोन बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून, त्यांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले आहे. सद्यस्थितीत दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील 165 लसींचा साठा उपलब्ध आहे.

सर्पदंशापासून धोका टाळण्यासाठी शेतात काम करत असताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा पिकांमध्ये सर्पांचा भक्ष्याच्या शोधासाठी वावर असल्याने काम करताना सर्पदंश होण्याचा संभव असतो. त्यासाठी दरवर्षी सर्पदंशाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व सर्पमित्रांकडून गावोगावी प्रबोधन केले जाते. सर्पदंश झाल्यानंतर वैदू, बुवा, बाबा यांच्याकडे घेऊन न जाता तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात अथवा खासगी रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सर्पांचे प्रमाण मानवी वस्तीकडे जास्त असेल तर आरोग्यासाठी चांगले, जेवढे प्रमाण कमी असेल तेवढे घातक ठरेल. कारण, उंदरांची शिकार सर्वात जास्त सर्पच करतात. परंतु, भीतीपोटी व अंधश्रद्धेपोटी बरेचसे सर्प मारले जातात. त्यामुळे सर्प दिसल्यास तत्काळ सर्पमित्रांना बोलवा.
– सचिन गिरी (सर्पमित्र-संगमनेर)

सर्पदंश झाल्यानंतर बाधित व्यक्तीला शांत करा आणि धीर द्या. याचबरोबर दंश झालेल्या भागाला स्थिर ठेवा, जेणेकरुन शरीरात विष पसरणार नाही. तत्काळ नजीकच्या सरकारी दवाखान्यात दाखल करा आणि सर्पदंशविरोधी लस टोचून घ्या.
– डॉ. सुरेश घोलप (तालुका आरोग्य अधिकारी-संगमनेर)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...