Sunday, November 22, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : स्त्री-पुरूष समानतेची गरज अधोरेखित करणारं 'इक्विलिब्रिअम'

राज्य नाट्य स्पर्धा : स्त्री-पुरूष समानतेची गरज अधोरेखित करणारं ‘इक्विलिब्रिअम’

– संदीप जाधव

पुरूषप्रधान समाजात हजारो वर्षांपासून स्त्रियांनी अतोनात अत्याचार सहन केला. स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जायची. मात्र, आजच्या बदलत्या काळात आता स्त्रियांकडूनच पुरूषांवर अत्याचार होण्याच्या घटना पाहायला मिळतात. स्त्री-पुरूषांमध्ये होणारा संघर्ष समाजासाठी, कुटुंबासाठी घातक आहे. नात्यांतील ही विषमतेची दरी मिटवायची असेल दोघांनीही एकमेकांना मनापासून समजून घ्यायला हवे. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी स्त्री-पुरूष समानता अत्यंत गरजेची आहे. मुलींनी शिक्षण, स्वाभिमान, स्वावलंबनाचा अंगिकार केला व मुलांनी संयम, जबाबदारी, स्त्रीआदर या गुणांची कास धरली तर स्त्री-पुरूष समानता योग्यपणे साधली जाईल, असा स्पष्ट संदेश देणारी ‘इक्विलिब्रिअम’ ही नाट्यकृती गुरुवारी (19 नोव्हेंबर) राज्य नाट्य स्पर्धेत रंगमंचावर पाहायला मिळाली. स्त्री-पुरूषांमधील गुण-दोष दाखवतानाच त्यांची जबाबदारीच्या ओझ्याखाली होणारी घुसमटही अधोरेखित केली.

- Advertisement -

अहिल्यानगरची सर्वांत जुनी नाट्यसंस्था सप्तरंग थिएटर्सने सादर केलेल्या ‘इक्विलिब्रिअम’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन डॉ. श्याम शिंदे यांनी केले. नेहमीच वेगळ्या थाटणीच्या विषयावर नाटक सादर करणार्‍या डॉ. शिंदे यांनी यंदा स्त्री-पुरूष समानतेवर आधारित संहितालेखन करून त्याचे दिग्दर्शनही केले. कलाकारांचा कसदार अभिनय आणि तांत्रिक बाजूंमुळे नाटकाचा विषय प्रेक्षकांना स्पष्ट समजला. मात्र, दुसर्‍या अंकातील संवाद लांबल्याने नाटकाची गती मंदावली. नाटकाचा आशय थेटपणे पोहोचण्यासाठी लिखाणात सीया-चेतन-केतनच्या ताज्या प्रकरणाचा केलेला समावेश फारच कल्पक वाटला.
नाटकाची सुरुवात एका टॅलेंट शोने होते. त्यात अनेक स्पर्धक आपापली कला दाखवितात. त्यात अस्मिता नावाची एक स्पर्धक रॅप साँग सादर करते. ती एक कट्टर स्त्रीवादी तरुणी असते. प्रत्येक पुरूषाचा ती तिरस्कार करत असते. अगदी स्पर्धेतील पुरूष जजेसचाही ती अपमान करते. नुकत्याच घडलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणाबाबत विचारल्यावरही ती सीयाच्या खुनी भूमिकेचे समर्थन करते.

याच शोमध्ये जज असलेला प्रचेत व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ असतो. नंतरच्या प्रसंगात एका कॉफी हाऊसमध्ये त्याची भेट आधुनिक विचाराच्या त्या बोल्ड अस्मिताशी होते. त्यांच्या संवादातून अस्मिताचे पुरूष तिरस्काराचे कारण समजते. नाटक, नृत्याचा छंद जोपासणार्‍या अस्मिताला त्यातच करिअर करण्याची इच्छा असते. मात्र, बारावीनंतर पालकांच्या विरोधामुळे तिच्यावर बंधने येतात. मात्र, लहान भावाला पालकांनी दिलेली मोकळीक तिला कमालीची खटकते. करिअर निवडीचा अधिकार हिरावल्याची सल तिच्या मनात असते. त्यातच प्रियकराकडून झालेली फसवणूक तिचा पुरूषी तिरस्कार आणखी गहरा करतो. या दोघांच्या संवादांतच पहिला अंक संपतो.

दुसर्‍या अंकात मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या प्रचेतकडे निराश झालेला सुशील येतो. पत्नीशी जवळीक होत नसल्याची तक्रार करतो. समुपदेशानंतर सुशील जातो. तितक्यात तेथे अस्मिता येते. चर्चेदरम्यान प्रचेत अस्मिताला पुन्हा सीया-केतन प्रकरणाबाबत मत विचारतो. ती स्पष्ट सांगते की, सीयाने केलेल्या केतनच्या खुनाचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, सीया या तरुणीवर ही वेळ का आली याचाही विचार का केला जात नाही. इच्छा नसतानाही तिच्यावर लादलेल्या लग्नाच्या बंधनाने तिची घुसमट झाली आणि तिने केतनला दरीत ढकलून दिले, असे ती सांगते. पुढे कॉफी हाऊसमध्ये दोघांची पुन्हा भेट होते. तेथे स्त्रियांवरील अत्याचार, भारतीय कौटुंबिक मानसिकता यावर ऊहापोह होते. अनादी काळापासून स्त्री अत्याचार सहन करत आली आहे. पण आताची स्त्री बदलली आहे, असे सांगतानाच पुराणातील सीता ते आजची सीया यांच्यात सांगड घालण्याचा प्रयत्न करते. प्रचेतच्या क्लिनिकमध्ये पुन्हा हाच विषय पुढे सलगपणे चर्चिला जातो.

प्रत्येक सुजाण नागरिकाला स्त्री अत्याचाराबाबत घृणा असतेच, पण सध्या स्त्रियांमध्येही गुन्हेगारी वाढल्याचे प्रचेत सांगतो. कुटुंंबाची जबाबदारी सांभाळताना पुरूषांना करावा लागणारा संघर्ष स्पष्ट करतो. पुरूष सहज व्यक्त होत नाही. त्यात त्याची घुसमट होते. बदलत्या सामाजिक परिस्थितीत पुरूषांकडे पर्याय नाहीे. त्यांनाही स्त्रियांच्या छळाला सामोरे जावे लागते. त्याला दुय्यम वागणूक दिली जाते, असे सांगतानाच समाजात वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण, राजकारणात स्त्रियांचा होत असलेला गैरवापर, स्त्रियांकडून होणारा सॉफ्ट व्हायोलेंस आदी विषयांना स्पर्श करतो. मात्र त्यावर ‘पुरूषी अत्याचारामुळेच स्त्रियांची अशी मानसिकता तयार झाली’ असे अस्मिता सांगते. दरम्यानच्या काळात प्रचेतचा क्लायंट सुशील त्याला भेटायला येतो आणि सर्व समस्या सुटल्याचे सांगतो.

त्यानंतर आलेल्या अस्मिताचे वर्तन पाहून प्रचेत चक्रावून जातो. जागतिक पुरूष दिनाचे औचित्य साधून प्रचेतला चक्क भेटवस्तू आणते. पुरूषांबद्दल आता कुठलाही तिरस्कार नसल्याचे सांगते. हे बदललेले रूप नाटक सकारात्मक शेवटाकडे नेते. आपण केवळ एकांगी विचार केल्यानेच पुरूषांबद्दल तिरस्कार केल्याचे ती सांगते. मुलीने शिक्षणावर भर देऊन स्वाभिमानाचा अंगिकार करून स्वावलंबी व्हावे, तसेच मुलांनी वर्तनात संयमीपणा आणावा व आलेली कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे उचलावी, स्त्रियांचा आदर करावा, तरच कौटुंबिक स्वास्थ्य टिकेल, असे मत अस्मिता मांडते. वडिलांशीही हटकून वागणारी अस्मिता मात्र त्यांच्याशी आपुलकीने फोन करते व नाटकावर पडदा पडतो. नाटकात एकूण 15 जणांच्या भूमिका असल्या तरी प्रचेत आणि अस्मिता या दोघांवरच नाटकाची सारी भिस्त होती. प्रचेतची भूमिका संकेत खेडकर यांनी साकारली.

संयमी व समंजसपणा त्यांच्या हावभावातून सहजपणे जाणवला. विविध प्रसंगांतील चर्चेतील संवाद स्पष्ट होते. बोलताना योग्य वेळी घेतलेले पॉझ परिणामकारक ठरले. कसलेल्या अभिनयामुळे भूमिका नीटपणे सादर झाली. नाटकात सर्वांत लक्षवेधी ठरलेल्या अस्मिताला आकांशा शिंदे यांनी रंगमंचावर आणले. प्रवेशावेळीच त्यांनी सादर केलेले रॅप साँग प्रेक्षकांना भावले. पुरूषी तिरस्कार व्यक्त करताना करारीपणा त्यांना छान जमला. प्रसंगानुरूप केलेले हावभाव व नैसर्गिक अभिनय यामुळे त्यांची भूमिका उठावदार झाली. आधुनिक विचारांच्या व स्वच्छंदी वर्तनाच्या तरुणीला त्यांनी योग्यपणे न्याय दिला. विचारांतील ठामपणा व मतपरिवर्तन झाल्यानंतरचे चेहर्‍यावरील हसरे भावही उत्तम वाटले.

सुशीलची भूमिका सागर अधापुरे यांनी केली. हताश हावभावाला निराश देहबोलीची चांगली साथ मिळाली. संवादही योग्य वाटले. पृथ्वी हे पात्र साकारणार्‍या योगेश शिंगवी याने मूकनाट्य उत्तम सादर केले. याशिवाय अक्षय कुरकुटे (तन्मय), कल्पेश शिंदे (साकेत), ओंकार बोथेकर (समीर), सायली महेश्वरी (सायली), आयुष घाणेकर (विशाल), सुरेखा घोलप (आई), आदिनाथ अन्नदाते (वडील), रियाज शेख (वेटर), शर्वरी भगत, अपूर्वा साठे आणि प्रज्ञा शिंदे यांनाही आपापली अभिनय जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न केला.

नेपथ्याची जबाबदारी दीपक ओहोळ व सुधीर देशपांडे यांच्याकडे होतेी. टॅलेंट शो, कॉफी हाऊस, क्लिनिक योग्य वाटले. प्रकाश योजना विक्रम गवांदे यांनी केली. कॉफी हाऊसमधील निळे दिवे व क्लिनिकच्या खिडकीतील प्रकाश भावला, मात्र, टॅलेंट शोच्या व फ्लॅशबॅकच्या प्रसंगात कॉफी हाऊसवर पडलेली लाईट योग्य वाटली नाही. संगीत गीता शिंपी व सदानंद अय्यंगार यांचे होते. पहिलाच प्रसंग प्रभावी करण्यात संगीत कारणीभूत ठरले. कॉफी हाऊसमधील प्रसंगातील मंद संगीत साजेसे ठरले. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी केली. पृथ्वी, अस्मिता व प्रचेतला त्यांनी योग्यरित्या रंगवले. अस्मिताचे पात्र त्यांच्या रंगभूषेमुळे प्रभावी वाटले. वेशभूषा कुंदा शिंदे यांनी केली. अस्मिताचे फॅशनेबल ड्रेस लक्ष वेधून घेत होते. टॅलेंट शोमधील स्पर्धकांबरोबरच, सुशील, वेटर यांचीही वेशूभूषा योग्य वाटली. रॅप लेखन कल्पेश शिंदे यांनी, तर गीतलेखन सदानंद अय्यंगार यांनी केले. रंगमंच व्यवस्था विवेक कसबे, संकेत शिंदे, योगिराज मोटे, दीपक गायकवाड आदींनी पाहिली.

स्त्री-पुरूष वृत्तीवर प्रकाश टाकणार्‍या या नाटकाने समानता कशी गरजेची आहे हा संदेश प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवला. लेखक व दिग्दर्शक यांनी लेखक-दिग्दर्शक या दुहेरी भूमिकेतून नाटक रंगवण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला. दोन्हीही मुख्य कलाकारांच्या अभिनय कौशल्याने नाटकाची उत्कंठता कायम ठेवली. मात्र नाटकात काही त्रुटी जाणवल्या. टॅलेंट शोमध्ये गुण देण्याचा अधिकार जजेसना असतो. मात्र, यात अँकरही गुण देताना दिसला! कॉफी हाऊसमधील अर्पिता-प्रचेतची चर्चा नंतरच्या प्रसंगात प्रचेतच्या क्लिनिकमध्ये सुरू सलग सुरू होते. या दोन्ही प्रसंगांमध्ये एखादी घडामोड दाखवता आली असती.

ताज्या बातम्या

मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण

0
दहिवड | मनोज वैद्य Dahivad मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील अनेक प्रवाशांना व वाहनधारकांना बर्निंग ट्रकचा थरार...