दहिवड | मनोज वैद्य Dahivad
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील अनेक प्रवाशांना व वाहनधारकांना बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला त्यामुळे एकच खळबळ उडाली. राहुड गावाजवळ घडलेल्या या घटनेत ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक MP09 HH5792 हा नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात असताना राहुड गावाजवळ अचानक ट्रकने पेट घेतला. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानिज यांच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती चांदवड अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, चांदवड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
वेळीच अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला, महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.




