ओझे l वार्ताहर Oze
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, रक्कम उत्पादकांचे खाती अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर भेट देऊन चेअरमन श्रीराम शेटे यांच्याशी चर्चा केली करत निवेदन दिले होते . यावेळी शेतकऱ्यांनी पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटन देण्याची मागणी केली होती. त्यावर शेटे यांनी कारखान्याची आर्थिक परिस्थिती आणि यंदाच्या गाळप हंगामातील अडचणी स्पष्ट केल्या.
यंदा शासनाने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नेहमीपेक्षा एक महिना अगोदर सुरू केल्याने सुरुवातीच्या काळात उसाची रिकव्हरी कमी होती. त्यामुळे बँकेकडून मिळणारी आर्थिक उचलही मर्यादित होती. परिणामी सुरुवातीला ३००० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्यात आली. मात्र, रिकव्हरीमध्ये वाढ होत जाईल आणि बँकेकडून आर्थिक उपलब्धता होईल, त्यानुसार ३२०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याचे आश्वासन शेतकरी शिष्टमंडळाला देण्यात आले होते.
त्यानुसार आता बँकेकडून आर्थिक उपलब्धता होताच ३२०० रुपये प्रतिटन पहिली उचल अदा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
कादवा कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, जिल्ह्यात ऊसाला सर्वाधिक भाव देत आलो असून यापुढेही ही परंपरा कायम राखली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन शेटे यांनी केले.
यंदा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऊस वेळेत तोडला जावा, यासाठी कारखान्याच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येत आहे. सर्व ऊस उत्पादकांनी कादवा सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे, व्हाईस चेअरमन शिवाजीराव बस्ते आणि संचालक मंडळाने केले आहे.




