Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik Crime News : वर्गमित्राकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग; त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Nashik Crime News : वर्गमित्राकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग; त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

डिजिटल मैत्री आणि शेअर मार्केटच्या नावाखाली जाळं

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आर्थिक फसवणुकीपुरती (Fraud) मर्यादित राहिलेली सायबर गुन्हेगारी आता वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून आत्महत्येपर्यंत (Suicide) ढकलण्यापर्यंत पोहोचली आहे. अंबड एमआयडीसी भागात घडलेल्या एका घटनेत, लहानपणीच्या वर्गमित्रानेच विश्वासघात करत एका महिलेचा मोबाईल हॅक करून तिचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि सततच्या ब्लॅकमेलिंगद्वारे तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

या प्रकरणी एमआयडीसी अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) संशयित कैलास उर्फ बंटी मिस्तरी (रा. नाशिक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबरचा गैरवापर करून केला जाणारा हा एक गंभीर प्रकार समाेर आला आहे. पीडित ३८ वर्षीय महिला शेअर मार्केटचा व्यवसाय करत होती. संशयित कैलास मिस्तरी हा तिचा शालेय जीवनातील वर्गमित्र होता. काही महिन्यांपूर्वी पुनर्भेट झाल्यानंतर त्यांच्यात सोशल मीडियाद्वारे संवाद सुरू झाला. मिस्तरीने तिच्या शेअर मार्केटच्या व्यवसायात सहभाग घेण्याच्या बहाण्याने तिचा विश्वास संपादन केला.

​विश्वास बसल्यानंतर तिची ओळखपत्रे प्राप्त केली आणि तांत्रिक मदतीचे कारण सांगून तिच्या मोबाईलमध्ये (Mobile) ॲनीडेक्स हे रिमोट ॲक्सेस ॲप डाऊनलोड करून घेतले. या ॲपच्या माध्यमातून आरोपीने महिलेच्या नकळत तिच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस मिळवून फोन हॅक केला. मोबाईलचा ॲक्सेस स्वतःकडे आल्यानंतर मिस्तरीने व्हॉट्सॲप आणि टेलीग्रामद्वारे पीडित महिलेशी संपर्क साधून तिला व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. या दरम्यान तिचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड करून त्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. होणारा मानसिक त्रास आणि बदनामीची भीती यामुळे या ३८ वर्षीय महिलेने ३ सप्टेंबर रोजी घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

​सुसाईड नोटमुळे भांडाफोड

सुरुवातीला या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांच्या हाती पीडित महिलेने लिहिलेली सुसाईड नोट लागली. या सुसाईड नोटमध्ये कैलास मिस्तरी याने दिलेल्या असह्य मानसिक त्रासामुळेच हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट लिहिले होते. या पुराव्याच्या आधारे मृत महिलेच्या नातेवाइकांनी तक्रार नोंदवल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पाेलिसांनी दाखल केला.

सध्याची स्थिती, पोलिसांचे आवाहन

​गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित कैलास पसार असून, सहाय्यक निरीक्षक दिलीप भंडे पुढील तपास करत आहेत. पथके त्याच्या शोधात आहेत. या घटनेमुळे अनोळखीच नव्हे, तर ओळखीच्या किंवा जुन्या मित्रांवरही आंधळा विश्वास ठेवून मोबाईलमध्ये कोणतेही रिमोट ॲक्सेस ॲप्स (उदा. एनीडेस्क, टीमव्हूवर) डाऊनलोड करणे किती घातक ठरू शकते, हा एक धोक्याचा इशारा समोर आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : डीजेच्या अतिआवाजाची रील भोवली; नाशिकमध्ये ३६ गणेश...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik गणेश विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan Mirvnuk) पारंपारिक वाद्यांच्या गजराऐवजी डीजे अन् साऊंड सिस्टीमच्या अतिआवाजाची आणि इन्स्टाग्रामवर कोणाचा आवाज मोठ्ठा? अशी...