नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
पपया नर्सरीकडून एक्सलो पॉईंटच्या दिशेने जात असताना चुंचाळे फाटा येथील मीना ट्रेडर्सजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२५) दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकी मोटारसायकल (एमएच १५ डीआर २५५०) वरून ईश्वर उकरडू जगताप (४०, रा. श्रमिकनगर, सातपूर ) हे सुनिल दादाजी बोरसे ( ५४, रा. बोलकर पोलीस चौकीसमोर, अशोकनगर, सातपूर) यांना मागे बसवून पपया नर्सरीकडून एक्सलो पॉईंटच्या दिशेने जात होते.
मीना ट्रेडर्स, चुंचाळे फाटा येथे ट्रकला (एमएच १४ ईएम ७९७७) डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना दुचाकी रस्त्यावर घसरली. त्यानंतर दुचाकीवरील दोघांना ट्रकची धडक बसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले सुनिल बोरसे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दुचाकीचालक ईश्वर जगताप हे देखील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत सुनील बोरसे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई व बहीण असा परिवार आहे. मनसेचे पदाधिकारी वैभव महिरे यांचे ते मावस भाऊ होत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
अंबड लिंक रोडवर तीन महिन्यांत अपघातात चार बळी
अंबड लिंक रोडवर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने डागडुजी न झाल्याने सध्या या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि मातीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघातांची संख्या वाढत असून, गेल्या तीन महिन्यांत या मार्गावर झालेल्या विविध अपघातांत तब्बल चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सुनिल बोरसे यांच्या कुटूंबियांना महापालिकेने मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .




