दिल्ली | वृत्तसंस्था
दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलन प्रकरणात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने २१ ऑक्टोबर रोजी दोघांच्या सुटकेचे आदेश दिले. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने ती फेटाळली.
नेमके प्रकरण काय?
सौरव दास आणि आशुतोष रांका हे कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक आहेत. जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जंतर-मंतरला अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतरही दोघे १३ ऑक्टोबर रोजी तेथे पोहोचले. त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड ओलांडल्याचा आणि शांतता राखण्याच्या हमीपत्रातील अटींचा भंग केल्याचा आरोप पोलिसांनी केला. १४ ऑक्टोबर रोजी दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. या मुदतवाढीला त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
दिल्ली उच्च न्यायालयात काय घडले?
२१ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती सुब्रमणियम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कोठडी वाढवण्याच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी कायद्यात अन्य पर्याय उपलब्ध असताना थेट उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.शांततेचे हमीपत्र दिल्यानंतर त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप आणि आंदोलनादरम्यान बॅरिकेड ओलांडल्याच्या मुद्द्यावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी आपली याचिका मागे घेतली. उच्च न्यायालयाने या याचिकेच्या गुणदोषांवर कोणतेही अंतिम मत व्यक्त केले नाही.
पोलिसांनी मागितली आणखी तीन दिवसांची कोठडी
दोघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत २१ ऑक्टोबर रोजी संपत होती. त्यांना पुन्हा विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने आणखी तीन दिवसांची कोठडी वाढवण्याची मागणी केली; मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून दोघांच्या सुटकेचे आदेश दिले.




