पुणे | प्रतिनिधी Pune
पुण्यातील लोहगाव परिसरात भारतीय हवाई दलाचा एक तोतया जवान वावरत असल्याचे उघडकीस आले असून लोहगाव पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत सतर्कतेने कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली आहे. शुभम विलास अंबुरे (वय २६ रा. स्वप्ननगरी सोसायटी, शिक्रापूर रस्ता, शिरूर, जि. पुणे)असे अटक करण्यात आलेल्या या तोतया जवानाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम याच्या ताब्यातून हवाई दलाचे बनावट ओळखपत्र आणि लष्करी गणवेश जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलात कार्यरत असलेले जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय ४८) यांनी याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी शुभम अंबुरे हा हवाई दलाच्या जवानासारखाच अधिकृत गणवेश परिधान करून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती हवाई दलाच्या लष्करी अधिकाऱ्यांना मिळाली होती. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोहगाव परिसरात ही हालचाल सुरू असल्याने लष्कराने याची गंभीर दखल घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्करी अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तपणे सापळा रचला आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या शुभम अंबुरे याला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी दरम्यान आरोपी शुभम याने लोहगावमधील गुरुद्वारा रस्त्यावर असलेल्या एका टेलरिंगच्या दुकानातून हवाई दलाच्या जवानांच्या गणवेशासारखा हुबेहूब लष्करी गणवेश स्वतःसाठी शिवून घेतला होता. एवढेच नव्हे तर, अधिकृत सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत धूळ फेकण्यासाठी त्याने स्वतःचे एक हवाई दलाचे बनावट ओळखपत्र देखील बेकायदेशीररीत्या तयार केले होते.
आरोपी शुभम अंबुरे याने इतक्या मोठ्या धाडसाने हा लष्करी गणवेश आणि बनावट ओळखपत्र नेमके कशासाठी तयार केले होते, तसेच तो लोहगाव परिसरात कोणत्या उद्देशाने किंवा कटकारस्थानाने वावरत होता, याबाबत पोलीस आता खोलवर चौकशी करत आहेत. लोहगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. शिंदे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.




