नवी दिल्ली | New Delhi
देशातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील २४ तासांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पूर्व उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल-सिक्कीम आणि विदर्भात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह मेघगर्जना, वीज आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीचा परिणाम
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीचा प्रभाव देशाच्या पूर्व आणि मध्य भागांवर कायम आहे. दक्षिण ओडिशा आणि लगतच्या उत्तर किनारी आंध्र प्रदेश परिसरातील डीप डिप्रेशन आता हळूहळू कमकुवत होत असून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले आहे. मात्र, या प्रणालीमुळे ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.
ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली असून, काही भागांमध्ये पूरस्थिती आणि पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. ओडिशातील काही भागांमध्ये गेल्या २४ तासांत अत्यंत मुसळधार पावसाची नोंदही झाली आहे.
कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा?
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल-सिक्कीम आणि विदर्भात २५ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय आसाम-मेघालय, बिहार, किनारी आंध्र प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
ज्ञानेश कुमारांना पद्म भूषण पुरस्कार द्या; भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
पूर्व उत्तर प्रदेशात अतिमुसळधार पावसासोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किमी प्रतितास, तर झोत ७० किमी प्रतितासापर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात हवामानाचा काय अंदाज?
महाराष्ट्रासाठी सध्याच्या अंदाजात विदर्भावर विशेष लक्ष आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने विदर्भासाठी २५ सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा इशारा दिला आहे. २६ सप्टेंबर रोजीही विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतर इशारा कमी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. २६ सप्टेंबर रोजी केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि यानममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, २६ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे, तर किनारपट्टीवरील कर्नाटकात २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडू शकतो.




