Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : अर्थकारणा बरोबरच निष्ठा, संबंधांचीही कसोटी

राज-का-रण : अर्थकारणा बरोबरच निष्ठा, संबंधांचीही कसोटी

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

विधान परिषदेची निवडणूक यंदा प्रथमच पैशांच्याही पलीकडे कदाचित इतर काही मुद्यांभोवती फिरू शकेल. राष्ट्रवादीची शंभरावर, उबाठाची पन्नासवर तसेच इस्लाम पार्टी, एमआयएम, मनसे, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व इतर असे साधारण दीडशे मतदार ऐनवेळेस काय भूमिका घेतील हेदेखील महत्त्वाचे राहील. इस्लाम पार्टी, एमआयएम, उबाठा असे काही पक्ष महायुतीला मतदान करताना हजारदा विचार करतील. त्याचमुळे तीनही उमेदवारांना आपणच विजयी होऊ, असा विश्वास वाटत आहे.

क्रिकेट अन् राजकारण अनिश्चिततेसाठी ओळखले जाते, याची प्रचिती सध्या राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रकर्षाने येत आहे. सोळा नियमित तर एक पोटनिवडणूक अशा सतरा जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असून पैकी सहा ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीतील तीनही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले असल्याने सत्तारूढ महायुतीत कसे सारे आलबेल आहे आणि ही युती कशी ग्रेट आहे वगैरे मुक्ताफळे उधळून झाली आहेत. मात्र, त्याचवेळी इतर अकरा ठिकाणी होत असलेल्या निवडणुकांमध्ये बव्हंशी महायुतीतच लढती होत असल्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

अनेक ठिकाणी तर या निवडणुकीच्या जागावाटपानंतर या पक्षांच्या नेत्यांनी ज्यारीतीने परस्परांवर चिखलफेक केली ती पाहता महायुती खरोखरच अभेद्य आहे की केवळ दिखावा आहे, असा प्रश्न पडावा. छत्रपती संभाजीनगरमधील निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी जे तारे तोडले आणि त्याला विदर्भातीलही काही आमदारांनी जी साथसंगत केली ती पाहता भाजप व शिवसेनेत अंतर्गत बरीच खदखद दिसते आहे. याच नाटकाचा आणखी एक प्रयोग सध्या नाशिक व जळगावमध्येदेखील होत आहे.

नाशिकची जागा शिवसेनेला सुटली असली तरी भारतीय जनता पक्षाच्या दोघांनी बंडखोरी केली आहे, तर जळगावची जागा भाजपकडे गेली असतानाही तेथे शिवसेनेने बंड केले आहे. दोन्ही जागांवरील बंडोबा आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने आता हा विषय वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात गेला आहे. तुम्ही आधी माघार घ्या नंतर आम्हीदेखील घेऊ अशा अटी-शर्ती भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना घालत असल्याने हा तिढा सुटता सुटत नाही. भाजपतर्फे गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे उदय सामंत हे मंत्रीद्वय या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत.

तिकडे जळगावमधील शिवसेनेच्या उमेदवार रेश्मा माळी यांनी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नसल्याचे जाहीर करून या मध्यस्थीच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. नाशिकलादेखील भाजपचे बंडखोर गोकुळ गिते यांनी कोणी काहीही सांगितले तरी आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली आहे. असे असले तरी महाजन यांना मात्र यातून मार्ग निघेल असे वाटत आहे, तर सामंत यांचा भरवसा महाजनांवर आहे. दोघेही एकमेकांना जोखत तर नाहीत ना, अशी शंका यावी अशी स्थिती गेल्या दोन दिवसांपासून येत आहे.

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ नाशिकमध्ये नंदिनी नदी स्वच्छतेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भाजपने हाती घेतला असून त्याचा शानदार व धडाकेबाज कार्यक्रम नुकताच नाशिकमध्ये झाला. याच दिवशी उदय सामंत हेदेखील नाशिकमध्ये होते. दोघांनीही या विषयावर भाष्य करताना लवकरच मार्ग निघेल असे सांगितले खरे; पण नाशिकमध्ये असूनही दोघे एकमेकांना भेटले नाही, याकडे आता सगळेच जण लक्ष वेधत आहेत. गोकुळ गिते हे भाजपचे नेते गणेश गिते यांचे बंधू आहेत. स्वत: गोकुळ हेदेखील पिंपळगाव बाजार समितीचे संचालक असून दोघा भावांमध्ये अत्यंत चांगले संबंध आहेत. त्याचमुळे पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून गणेश गिते यांनी माघार घेतली असली तरी गोकुळ हे त्यांचेच डमी असल्याची सर्वांचीच खात्री आहे.

असे असताना महाजन किंवा मुख्यमंत्री गितेंना माघार घ्यायला का सांगत नाहीत, अशी पृच्छा आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. असाच कित्ता तिकडे जळगावातही गिरविला जात आहे. तेथे नगरसेवक राहिलेल्या व महिला वर्गातील आक्रमक चेहरा असलेल्या रेश्मा माळी या शिवसेनेच्या उमेदवार असल्या तरी त्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थक आहेत. त्यांनाही गुलाबराव यांनी सांगितले तर ती माघारदेखील होऊ शकते, असे सांगितले जाते. किंबहुना, त्यांना गुलाबराव पाटलांचाच आशीर्वाद असल्याचीही चर्चा आहे. तीच गत नाशिकच्या गितेंची. गिते बंधू यांचे गिरीश महाजन यांच्याशी असलेले विशेष सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळेच महाजन व पाटील हे दोघे एकमेकांची ताकद तर यानिमित्ताने आजमावित नसावेत ना, असेही बोलले जाते आहे. याचाच अर्थ दोन्ही पक्ष कोण किती पाण्यात आहेत, याचा अदमास घेताना दिसत आहेत.

खरे तर दोन्हीकडे भाजपच्या मतदारांची संख्या लक्षणीय तर आहेच, शिवाय अपक्ष तसेच छोट्या पक्षांची मते खेचून आणण्याची त्यांची क्षमतादेखील कांकणभर जास्तच आहे. त्याचमुळे ही खेचाताणी सुरू असल्याचे दिसते. जळगावमध्ये ६३० मतदार असून एकट्या भाजपकडे २४८ मते आहेत. त्या तुलनेत शिवसेनेकडे केवळ १७९ मते आहेत. शिवाय पूर्वी ही जागा भाजपकडेच असल्याने यंदाच्या जागावाटपात त्यांनी ही जागा राखली. नाशिकची जागा शिवसेनेकडेच होती म्हणून त्यांनी ही जागा मिळाली हे खरे असले तरी यावेळी भाजपकडे जळगावप्रमाणेच शिवसेनेपेक्षा अधिक मते आहेत. साहजिकच दोन्ही जागांवर भाजपने दावा केला होता. जागावाटपात सामंजस्य झाले तरी प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपापली भूमिका पुढे रेटल्याने तिढा निर्माण झाला आहे. मतदानाला आणखी आठ दिवस राहिलेले असले तरी ज्या पद्धतीने दोन्ही पक्षातील नेत्यांची वक्तव्ये येत आहेत, ती पाहता होऊनच जाऊ द्या एकदा अशा निर्णयाप्रत ते आलेले दिसत आहेत.

जळगावमध्ये भाजपला फारशी अडचण येणार नसली तरी नाशिकमध्ये मात्र शिवसेनेची स्थिती तशी नाही. कारण प्रश्न केवळ गोकुळ गिते यांचा नाही तर भाजपचेच दुसरे बंडखोर प्रसाद हिरे यांचाही आहे. त्यांना तर भाजपनेही गृहीत धरलेले नाही. माघारीसाठी त्यांची कोणी मनधरणीही केली नाही. हिरेंचे अस्तित्व नाकारूनच दोन्ही पक्ष चाललेले दिसतात. समजा, अखेरच्या क्षणी जळगाव व नाशिकची तडजोड झाली आणि गितेंना माघार घेणे भाग पडले तर प्रसाद हिरे हेच पर्यायी उमेदवार ठरू शकतात. गितेंच्या नाराजीचा त्यांना फायदा होऊ शकतो. भाजपने कदाचित या सगळ्यांचा विचार केलेला असू शकतो. म्हणूनच त्यांनी किमान आतापावेतो तरी ना गितेंना ना हिरेंना माघारीची गळ घातली. हिरे हे सध्या भाजपचे सक्रिय नेते आहेत. साहजिकच त्यांच्या माघारीची जबाबदारी भाजपचीच अधिक होती. परंतु त्यांना सुरुवातीपासून अनुल्लेखाने मारले गेले. दोन वंजारी उमेदवारांमध्ये आपले मराठा कार्ड चालून जाईल या विश्वासाने त्यांनी उमेदवारी केलेली दिसते. अशा निवडणुकांमध्ये जात-पात, संबंध, निष्ठा हे सारे गुंडाळून ठेवावे लागते. केवळ पैसाच बोलतो, हे जगजाहीर आहे.

प्रश्न फक्त एवढाच असतो की कोणाची बोली अधिक. त्याचबरोबर यंदा संबंधांचीही चर्चा होत आहे. दराडे यांच्या कारकीर्दीत त्यांनी मतदारांशी फारसा संपर्क ठेवला नाही, या मुद्यावर गिते भर देत असल्याचे दिसते. गितेंचे जिल्ह्यात अनेकांशी केवळ व्यक्तिगतच नव्हे तर व्यावसायिकही संबंध असल्याने त्या जोरावर त्यांचे हौसले बुलंद आहेत. शिवाय दराडे यांचे मंत्री छगन भुजबळ, आमदार सुहास कांदे यांच्याशी जमत नाही. राष्ट्रवादीचे मतदार शंभरावर तर कांदेंना मानणारे पाऊणशे तरी आहेत. या दोघांशी गितेंचे मात्र चांगले संबंध आहेत. इस्लाम पार्टीच्या बशीर यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे गोकुळ गितेंशी उत्तम संबंध आहेत. गितेंच्या उमेदवारी अर्जावरील सूचकांच्या यादीवर नजर टाकली तरी काही गोष्टी लक्षात येतील. एकूणच, पैशांबरोबरच हे असे इतरही अनेक कंगोरे या निवडणुकीत पुढे येत आहेत. अर्थात, दराडे यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. शिवाय, यावेळेस त्यांच्यापेक्षाही ही निवडणूक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे त्यांचे निवडून येणे ही शिंदेंच्या शागीर्दांचीही जबाबदारी आहे.

सुहास कांदे यांची त्यामुळे कसोटी लागेल. भुजबळ सध्या त्यांच्या संभाव्य राज्यसभेच्या उमेदवारीच्या गडबडीत असल्याने त्यांनी अद्याप याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. तरीही त्यांना ज्यारीतीने दराडेंचा त्रास गेली काही वर्षे होत आहे, तो पाहता भुजबळ कोणत्याही परिस्थितीत त्यांना मदत करणार नाहीत. आता मूळ प्रश्न असा राहतो की दराडे नको असे मानणारी मते गितेंकडे जातील की हिरेंकडे वळतील, हादेखील एक पेच आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे यंदा प्रथमच ही निवडणूक पैशांच्याही पलीकडे कदाचित इतर काही मुद्यांभोवती फिरू शकेल. राष्ट्रवादीची शंभरावर, उबाठाची पन्नासवर तसेच इस्लाम पार्टी, एमआयएम, मनसे, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व इतर असे साधारण दीडशे मतदार ऐनवेळेस काय भूमिका घेतील हेदेखील महत्त्वाचे राहील. इस्लाम पार्टी, एमआयएम, उबाठा असे काही पक्ष महायुतीला मतदान करताना हजारदा विचार करतील. त्याचमुळे तीनही उमेदवारांना संधी वाटत आहे. या चुरशीमुळे अर्थातच मताचा भाव वधारणार यात शंका नाही. या वधारलेल्या बाजारभावात कोण अधिकची बोली लावून सरशी करतो, हे पाहणे मनोरंजक तर ठरेलच; शिवाय जिल्ह्याच्या राजकारणाला त्यामुळे काही वेगळे वळण लागणार का याचीही उत्सुकता आहेच.
मो. ९३२५३८३०९२

ताज्या बातम्या

पुढील 4 दिवस धो-धो, वादळी पावसाची शक्यता; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?

0
मुंबई । Mumbai राज्यात गेल्या काही दिवसांपासून काहीसा मंदावलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढू लागला असून, हवामान विभागाने...