Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रपुढील 4 दिवस धो-धो, वादळी पावसाची शक्यता; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?

पुढील 4 दिवस धो-धो, वादळी पावसाची शक्यता; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून काहीसा मंदावलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढू लागला असून, हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात पावसाचा प्रकोप वाढण्याची शक्यता लक्षात घेता ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या नैऋत्य राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत नव्याने हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येत्या दोन दिवसांत या प्रणालीची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील कमी दाबाच्या केंद्रापासून पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. या सर्व वातावरणीय बदलांमुळे महाराष्ट्रातील हवामानात वेगाने घडामोडी घडत आहेत.

उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी कोकणातील रायगड व रत्नागिरी, तसेच सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

तथापि, राज्याच्या अंतर्गत भागात म्हणजेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित सखल भागात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र आहे. शनिवारी दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पावसाचा प्रभाव कमी असलेल्या अंतर्गत भागांत पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

विदर्भाच्या हवामानात मात्र मोठा बदल पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस विदर्भात तीव्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ११ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वादळी पावसाच्या वेळी सुरक्षित स्थळी आश्रयाला राहण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...