Thursday, April 2, 2026
HomeनगरCrime News : लोणीतील ज्वेलर्समध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून ७ लाखांची लूट; भरदुपारची...

Crime News : लोणीतील ज्वेलर्समध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून ७ लाखांची लूट; भरदुपारची घटना

राहाता (प्रतिनिधी)

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या गुन्ह्याचा छडा अवघ्या १२ तासांत लावून, लोणी बुद्रुक येथील सराफ दुकानात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात सराईत गुन्हेगार बबन भाऊसाहेब घावटे (श्रीगोंदा) आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. हा आरोपी यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यांत मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेला आहे.

- Advertisement -

लोणी येथील अजय ज्वेलर्सचे मालक राजेंद्र ताराचंद नागरे यांच्या दुकानात २७ नोव्हेंबर रोजी दुपारी बबन घावटे आणि त्याचे तीन साथीदार ग्रे रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले. आरोपींनी थेट फिर्यादीवर हल्ला चढवला. तुझ्या मयत चुलतभावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पैसे दे, अशी धमकी देत, त्यांनी नागरे यांच्या संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. घावटे याने कमरेला खोसलेले गावठी पिस्तुल बाहेर काढून दहशत निर्माण केली.

या दहशतीखाली आरोपींनी दुकानाच्या ट्रेमधील पाच सोन्याचे नेकलेस जबरदस्तीने ओढले. या झटापटीत फिर्यादी जखमी झाले. दागिने आणि मोबाईल हिसकावून घेत, आरोपी स्विफ्ट कारमधून पळून गेले. या घटनेने लोणी परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार कबाडी यांना त्वरित तपासाचे आदेश दिले. पोउपनि संदीप मुरकुटे आणि अनंत सालगुडे यांच्या पथकांनी लगेचच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गोपनीय माहिती मिळवली. पथकांना माहिती मिळाली की, आरोपी त्यांच्या ग्रे रंगाच्या स्विफ्ट कारमधून बेलवंडी फाट्यावरून जाणार आहेत. या माहितीच्या आधारे बेलवंडी फाट्यावर सापळा रचण्यात आला.

रात्रीच्या वेळी पथकाने येणारी स्विफ्ट कार थांबवून आरोपी बबन घावटे आणि त्याचा साथीदार कृष्णा गायकवाड यांना ताब्यात घेतले. तपासणीत आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, पाच मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली ७ लाखांची स्विफ्ट कार असा एकूण ७ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापैकी बबन घावटे हा खुनाच्या प्रयत्नासह एकूण १६ गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचे दोन फरार साथीदार संकेत जाधव आणि करण खरात यांचा शोध सुरू आहे

ताज्या बातम्या

Sangamner : विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा कलावंतांवर हल्ला

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत, इतरांना बोलावून घेत कलावंतांना बेदम मारहाण...