Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : रक्तपेढीच्या उद्घाटनाला मुहूर्त कधी?

पडसाद : रक्तपेढीच्या उद्घाटनाला मुहूर्त कधी?

अत्याधुनिक सुविधा असलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन तिसर्‍यांदाही रद्द करावे लागल्याची नामुष्की नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या प्रशासनावर नुकतीच आली. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं अशी एक म्हण आपल्याकडे नेहमी सांगितली जाते. त्याचे चपखल उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहावे लागेल. महापालिकेच्या नाशिकरोड परिसरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात सियुरिटी प्रेसतर्फे तीन कोटी रुपयांच्या सीएसआर निधीद्वारा ही रक्तपेढी उभी राहिली आहे. ती सुरू करण्यात काय अडचणी आहेत हे अद्याप बाहेर आलेले नसले तरी या नकटीच्या नशिबी गेली अनेक वर्षे सातत्याने विघ्नं येतच आहेत.

- Advertisement -

बिटको रुग्णालय म्हणून विशेष परिचित असलेले हे रुग्णालय स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणार्‍या रुग्णालयांमधील सर्वात मोठे असल्याची खरे तर नेहमीच फुशारकी मारली जाते. सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नव्या रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह सर्वप्रकारच्या सुविधा असल्याबाबतही आवर्जून सांगितले जाते. प्रत्यक्षात नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा अशी स्थिती आहे. अडीचशे खाटांच्या या बहुमजली अत्याधुनिक रुग्णालयात एकावेळी दीडशे रुग्णांनाही दाखल करून घेणे दुरापास्त होते. कारण काय तर कर्मचारी वर्गाची अपुरी संख्या. ६० ते ६५ परिचारिका, ४० ते ५० वॉर्ड बॉय, पूर्णवेळ डॉटर्स ५० आणि मानधनावरील डॉटर्स ४० ते ४५ अशी संख्या आहे. परिणामी, अनेक वॉर्डात एकाच परिचारिकेला सेवा द्यावी लागते. जळीत कक्ष येथे बंद आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होत नाहीत. दात व नाकाशी संबंधित किरकोळ त्रासाची दखल घेतली जाते; पण त्यावरील शस्त्रक्रियांसाठी मेडिकल कॉलेज किंवा एसएमबीटी रुग्णालयात रुग्णांना पाठविले जाते.

हर्निया, मूतखडा व अपेंडिससारख्या आजारातील गांभीर्य न ओळखता तारीख पे तारीख दिली जाते, अशा तक्रारी आहेत. काही डॉटर्स वर्षानुवर्षे येथेच ठाण मांडून बसलेले असल्याने असून अडचण नसून खोळंबा या उक्तीचा नेहमीच प्रत्यय येतो. कोट्यवधीचे एमआरआय मशीन येथे बसविले गेले, पण सुरुवातीला ते अनेक महिने धूळ खात पडून राहिले. नंतर मोठ्या हिकमतीने सुरू झाले तर त्यात केवळ रिपोर्ट दिले जात. आवश्यक असलेली फिल्म दिली जात नसे. याबाबतही बाहेरच्या एमआरआयवाल्यांचे धंदे व्हावेत म्हणून असे केले जात असल्याचे आरोप झाले होते. बाजारात किमान दहा ते पंधरा हजार रुपयांत एमआरआय केले जाते, ते येथे अवघ्या हजार रुपयात होत असल्याने त्याला अवसानघात करण्याचा प्रयत्न काही झारीतील शुक्राचार्य करीत राहिले. सध्या हे मशीन व्यवस्थित सुरू असले तरी त्यासाठी काही सुजाण नागरिकांना त्यासाठी मोठा लढा द्यावा लागला आहे.

हे सारे विस्ताराने एवढ्यासाठी द्यावे लागले की, बिटको रुग्णालयाचा हा आजार नैसर्गिक नसून मानवी आहे. तेथील मानसिकताच दूषित आहे. काही लोक निश्चित चांगले आहेत; पण दुर्दैवाने कामचुकारांचा भरणा अधिक आहे. करोना काळात मात्र येथे झालेले काम सर्वांनीच नावाजले होते. पण करोना आटोपला आणि चांगल्या कामालाही घरघर लागली. या नकारात्मक वातावरणाचा परिणाम संपूर्ण व्यवस्थेवर झालेला दिसतो. केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या नोटप्रेस व्यवस्थापनाने सीएसआर उपक्रमांतर्गत सुमारे तीन कोटींचा निधी पालिकेला रक्तपेढीसाठी दिला. ही रक्तपेढी सुरू झाली तर गोरगरिबांना मोठाच दिलासा मिळणार आहे. परंतु केवळ औपचारिक उद्घाटनामुळे सगळेच ठप्प झाले आहे. गेल्या आठवड्यात एकाच दिवसात तीन वेळा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना वेळ नसल्याचे कारण दिले जात असले तरी ते पटणारे नाही. पश्चिम बंगालमधील अभूतपूर्व विजयामुळे करावयाच्या जल्लोषाला वेळ मिळावा म्हणून हे उद्घाटन रद्द केले गेल्याची भूमका उठली आहे, तर काहींच्या मते काही महाभागांच्या श्रेयाच्या लठ्ठालठ्ठीत हा कार्यक्रम अडकला आहे. नेमके कारण काय हे कोणीच सांगायला तयार नसले तरी प्रेसच्या अधिकार्‍यांना तीनदा तेथे येऊन निराश होऊन परतावे लागले आहे. निधी देणार्‍यांविषयी एवढी अनास्था असेल तर पालिकेच्या मदतीसाठी लोक पुढे कसे येतील, याचा विचार प्रशासनाने करायला हवा. अलीकडे अशा सीएसआर निधीसाठी पुढारी वारंवार आवाहने करतात. पालिकेने तर अधिकृतरीत्या अनेक कंपन्यांकडे अशा निधीची मागणी करून विकासकार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले आहे. असे असताना केवळ वेळ नाही म्हणून रक्तपेढीसारख्या अनन्य महत्त्वाच्या आस्थापनाचा शुभारंभ लांबणीवर पडणार असेल तर ते शोभादायक निश्चितच नाही.

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ मोठे निर्णय; नाशिक...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...