अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यात 2011 ला झालेली जनगणना आणि तिच्या वाढीचा अंदाज गृहीत धरून त्यानुसार पुढील पाच वर्षाच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने तालुका पातळीवरून ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवर्ग (ओबीसी) यांची टक्केवारी आणि लोकसंख्या मागवली होती. तालुका पातळीवरून आलेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आकडेवारीत अहिल्यानगर जिल्ह्यात 8 लाख 27 हजार 150 ओबीसींची लोकसंख्या असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. या लोकसंख्येची टक्केवारी 22.64 टक्के असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान नगर जिल्ह्यात 36 लाख 53 हजार 339 एकूण ग्रामीण लोकसंख्या असून यात 4 लाख 47 हजार 695 अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. त्याची टक्केवारी 12.25 तर 3 लाख 55 हजार 374 अनुसूचित जमातीची लोकसंख्या असून त्याची टक्केवारी 9.73 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यात 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्हा निवडणूक विभागाकडे त्या-त्या जिल्ह्यात असणारे एकुण ग्रामपंचायती, यातील अनुसूचित जाती-जमाती यांच्या लोकसंख्येसह त्यांची टक्केवारी याबाबतची माहिती मागवली होती. या माहितीत ग्रामविकास विभागाने अलीकडच्या काही वर्षात पहिल्यांदा जिल्ह्यातील ओबीसी (नागरिकांचा प्रवर्ग) यांची लोकसंख्या आणि त्याची टक्केवारी याबाबतची माहिती मागवली होती.
जिल्हा प्रशासनाने ही माहिती सादर करण्याचे आदेश तालुका पातळीवर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना मागील महिन्यात दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुका प्रशासनाने आपली माहिती व एससी, एसटी तसेच ओबीसी प्रवर्गाची माहिती, त्यांची लोकसंख्या आणि टक्केवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवले आहे.
या माहितीबाबत प्रत्येक तालुका प्रशासनाशी संपर्क करून घेतलेल्या माहितीमध्ये नगर जिल्ह्यात आठ लाख 27 हजार 150 ओबीसी प्रवर्गातील नागरिक असल्याचे सांगण्यात आले. यात जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 22.64 टक्के ओबीसींची लोकसंख्या असल्याचे समोर आले आहे.
सर्वाधिक ओबीसी शेवगावमध्ये सर्वात कमी अकोले तालुक्यात
जिल्ह्यात सध्या सर्वाधिक ओबीसींची लोकसंख्या आणि टक्केवारी ही शेवगाव तालुक्यात असल्याचे दिसत आहे. शेवगाव तालुक्यात 98 हजार 628 ओबीसी असून त्यांची टक्केवारी 47.57 टक्के आहे, तर सर्वात कमी ओबीसींची संख्या अकोले तालुक्यात दहा हजार 667 असून त्याची टक्केवारी 3.78 टक्के आहे.
ओबीसी आणि त्यांची टक्केवारी
अकोले 10 हजार 667 (3.78 टक्के), संगमनेर 58 हजार 888 (13.95 टक्के), जामखेड 37 हजार 205 (29.92 टक्के), श्रीरामपूर 48 हजार 266 (24.35 टक्के), शेवगाव 98 हजार 628 (47.57 टक्के), कोपरगाव 39 हजार 480 (16.8 टक्के), नगर शहर 70 हजार 323 (22.81 टक्के), राहुरी 72,293 (28.81 टक्के), पाथर्डी 54 हजार 606 (23.65 टक्के), पारनेर 48 हजार 85 (18.42 टक्के), श्रीगोंदा 74 हजार 762 (26.25 टक्के), राहाता 43641 (16.65 टक्के), नेवासा 95 हजार 790 (26.77 टक्के), कर्जत 73 हजार 556 (32.82 टक्के) असे आहे.