अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘नाजूक’ संबंध असल्याच्या संशयावरून एका तरूणाला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना फर्याबाग परिसरातील केदार वस्ती येथे रविवारी (3 मे) रात्री 12:20 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी सुधाकर केदारे (वय 30, रा. केदार वस्ती, फर्याबाग, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सुहास दामोदर शिंदे, संदेश सुहास शिंदे, अनुग्रह सुहास शिंदे (सर्व रा. केदार वस्ती, फर्याबाग) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी केदारे हे केदार वस्ती भागात वास्तव्यास आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी सुहास शिंदे, संदेश शिंदे आणि अनुग्रह शिंदे यांनी सनी यांना गाठले. यावेळी सुहास शिंदे याने सनीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वादावादी केली.
रागाच्या भरात सुहासने लाकडी दांडक्याने सनीच्या डोक्यात प्रहार केला, तर संदेश आणि अनुग्रह या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संशयित आरोपींनी सनी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत जखमी झालेल्या सनी यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर सनी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.





