Monday, August 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : 'राज' की बात अन् भाजपची वाट!

राज-का-रण : ‘राज’ की बात अन् भाजपची वाट!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा आणि त्याचवेळी भारतीय जनता पक्षामध्ये उत्तर महाराष्ट्रात उफाळून आलेला अंतर्गत वाद, या दोन घटनांनी गेल्या आठवड्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजविली. एका बाजूला मनसे आपली गमावलेली संघटनात्मक ताकद पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत असताना दुसर्‍या बाजूला शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख सांगणारा भाजप स्वतःच्याच नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे आणि अंतर्गत वादामुळे अडचणीत आला आहे.

बर्‍याच दिवसांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नाशिकचा दौरा झाला. दोन दिवसांचा हा दौरा नेहमीप्रमाणे दीड दिवसात आटोपला असला तरी यावेळेस त्यांना ‘जेन झी’चा मिळालेला प्रतिसाद आणि संघटनात्मक तसेच मुद्यांच्या रणनीतीविषयी त्यांनी दाखविलेला रस व त्यादृष्टीने केलेले मार्गदर्शन यामुळे हा दौरा काहीसा वेगळा ठरला. तसेही महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता समीकरणांचे खेळ आणि पक्षांतर्गत राजकीय घडामोडी नेहमीच वेगाने घडत असतात. उत्तर महाराष्ट्राचे आणि विशेषतः नाशिकचे राजकीय महत्त्व राजकारणात नेहमीच अनन्यसाधारण राहिले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा नाशिक दौरा आणि त्याचवेळी भारतीय जनता पक्षामध्ये उत्तर महाराष्ट्रात उफाळून आलेला अंतर्गत वाद, या दोन घटनांनी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजविली. एका बाजूला मनसे आपली गमावलेली संघटनात्मक ताकद पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत असताना दुसर्‍या बाजूला शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख सांगणारा भाजप स्वतःच्याच नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे आणि अंतर्गत वादामुळे अडचणीत आला आहे.

बर्‍याच कालावधीनंतर राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला. खरेतर नाशिक हा मनसेसाठी आणि दस्तुरखुद्द राज ठाकरे यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा राहिला आहे. भूतकाळात नाशिककरांनी मनसेच्या हाती महापालिकेची सत्ता व तीन आमदार देऊन राज ठाकरेंवर मोठा विश्वास दाखवला होता. त्यामुळे राज ठाकरेंच्या याच नव्हे पण प्रत्येक दौर्‍याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असतेच. या दौर्‍यादरम्यान राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी प्रदीर्घ आणि सविस्तर चर्चा केली. संघटनात्मक पुनर्बांधणीच्या दृष्टीने त्यांनी पदाधिकार्‍यांना मतदार पुनरिक्षण मोहिमेवर अत्यंत गांभीर्याने आणि प्राधान्याने काम करण्याचा सल्ला दिला. गेली अनेक दिवस खोळंबलेली जिल्हा कार्यकारिणी या दौर्‍यात मार्गी लागलेली दिसली.

या दौर्‍याचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘जेन झी’ (ॠशप न – नवमतदार आणि तरुण वर्ग) कडून राज ठाकरेंना मिळालेला चांगला प्रतिसाद. ठिकठिकाणी या तरुणांनी राज यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक तरुण-तरुणी चक्क खास त्यांना भेटायला गेले. तरुण कार्यकर्त्यांची झालेली गर्दी पाहता, आजही नवमतदारांमध्ये त्यांच्या वक्तृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची भुरळ असल्याचे दिसून येते. तरुणाईला राजकीय प्रवाहात आकर्षित करण्यात राज ठाकरे नेहमीच यशस्वी ठरले आहेत आणि नाशिकमध्येही त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला.

मात्र, राजकारणात केवळ आकर्षण आणि वलय असून चालत नाही, तर सातत्य आणि वेळेवर घेतलेले संघटित निर्णय अधिक महत्त्वाचे ठरतात. राज ठाकरे यांनी मतदार पुनरिक्षण मोहिमेचा जो मुद्दा आता हाती घेतला आहे, त्यासाठी बराच उशीर झालेला दिसतो. मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि त्रुटी दूर करणे ही कामे अचानक किंवा घाईघाईत पूर्ण होत नाहीत. यासाठी सातत्याने संघटनात्मक पातळीवर जमिनीवर उतरून काम करावे लागते. शिवसेना ठाकरे गटाने या मुद्यावर दोन महिन्यांपूर्वीच बैठका घेऊन विभागनिहाय पक्षाचे बीएलओ नियुक्त करून आघाडी घेतली होती.
नंतर इतर पक्षांनीही हा विषय हाती घेतला खरा, पण प्रत्यक्ष मोहिमेत मात्र सत्तारुढ युतीतील घटक पक्षांनीच अधिक प्रामाणिकपणे काम केलेले दिसले. राजकीय विश्लेषकांच्या मते, राज ठाकरे आणि मनसेची हीच सर्वात मोठी कमकुवत बाजू राहिलेली आहे. राज ठाकरेंची राजकीय वाटचाल ही अनेकदा ‘दौरे आणि प्रदीर्घ विश्रांती’ अशा स्वरुपाची राहिलेली दिसते. त्यांची ही काहीशी चलता है प्रवृत्ती किंवा राजकीय कामकाजातील सातत्याचा अभाव अनेकदा पक्षाच्या मुळावरच घाव घालताना दिसतो. एखाद्या मुद्यावर अचानक सक्रिय व्हायचे, चर्चा घडवून आणायची आणि नंतर पुन्हा दीर्घकाळ राजकीय शांततेत जायचे, या कार्यपद्धतीमुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचा उत्साह मावळतो. मतदार नोंदणीसारखा पायाभूत कार्यक्रम हाती घेण्यास झालेला उशीर हा याच प्रवृत्तीचा परिपाक मानला जात आहे.

या दौर्‍यात राज ठाकरे यांनी नाशिक शहरातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवर, विशेषतः रस्त्यांवरील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावर जोरदार टीका केली. नाशिककरांना सध्या खड्ड्यांमुळे अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. हाच कळीचा धागा पकडत राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि रस्त्यांच्या या दुर्दशेला ‘गुजराती ठेकेदार’ जबाबदार असल्याचा थेट आरोप केला. मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणत, त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक कामांची कंत्राटे परप्रांतीय, विशेषतः गुजराती ठेकेदारांना का दिली जातात, असा सवाल उपस्थित करत सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल केला. मनसेच्या महापालिकेतील सत्तेच्या काळात झालेल्या कामांचा आठव करण्याचा शहाणपणाही त्यांनी दाखवून आमच्याच कामावर दावा करून नंतरचे सत्ताधारी आयजीच्या जीवावर बायजी उदार असल्याचे दाखवून दिले.

राज ठाकरेंच्या या ‘गुजराती ठेकेदार’ आरोपाचे पडसाद सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अपेक्षेप्रमाणे तत्काळ उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तत्काळ संयत पण स्पष्ट शब्दांत प्रतिसाद दिला. शासकीय कामे, निविदा किंवा कंत्राटे देताना कोणत्याही व्यक्तीची जात, धर्म किंवा प्रांत पाहून कामे दिली जात नाहीत. जो निविदेच्या कायदेशीर अटींची पूर्तता करतो, त्यालाच नियमानुसार काम मिळते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जातपातीच्या चौकटीत कंत्राटे दिली जात नसल्याचे स्पष्ट केले. दुसर्‍या बाजूला, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी या आरोपांवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी राज ठाकरेंना थेट आव्हानच दिले.

नाशिकमध्ये कोणत्या गुजराती ठेकेदाराला रस्ते किंवा खड्ड्यांचे काम दिले आहे, ते राज ठाकरेंनी पुराव्यासह दाखवून द्यावे. हवेत थेट आरोप करण्यापेक्षा त्यांनी तो ठेकेदार समोर आणावा, असे आव्हान महाजन यांनी दिले. यामुळे नाशिकच्या राजकीय वातावरणात मनसे विरुद्ध भाजप असा नवा वाद पेटला. सध्या सिंहस्थाच्या विकासकामांमुळे नाशिकची जी भयावह अवस्था झाली आहे, ती पाहता मनसेनेही महाजनांचे आव्हान स्वीकारून हे ठेके कोणाचे, त्यांनी कोणा-कोणाला सबलेट केले, त्यात बेनामी नावांनी भाजपच्या कोणी-कोणी हे ठेके सध्या घेतले आहेत या विषयांचे खोदकाम केल्यास बरेच काही हाताशी लागू शकेल.

भाजप संस्काराची चौकट निखळली
एकीकडे गिरीश महाजन राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देत असताना, दुसरीकडे त्यांच्याच पक्षात म्हणजेच भाजपमध्ये उत्तर महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपचे नंदुरबारमधील नेते विजय चौधरी यांच्यावर त्यांच्याच पक्षातील लोकांनी अत्यंत गंभीर आरोप केले, ज्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. या संपूर्ण प्रकरणाचे मूळ एका टेलिफोनिक संवादाच्या ऑडिओ लिपमध्ये दडले होते. चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक कथित टेलिफोनिक संवाद बाहेर आला. या संवादाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. या व इतर अनेक लिक झालेल्या लिपमधील संवादात चौधरी यांनी स्वतःच्याच पक्षाच्या दोन ज्येष्ठ आणि जबाबदार महिला लोकप्रतिनिधी-खासदार रक्षा खडसे आणि डॉ. हीना गावित यांच्याविरोधात अत्यंत अश्लाघ्य, हिणकस आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला आढळला.

भाजपसारखा पक्ष जो स्वतःला महिलांचा सन्मान करणारा आणि शिस्तबद्ध पक्ष मानतो, त्याच पक्षाच्या एका पदाधिकार्‍याने स्वतःच्याच पक्षातील महिला खासदारांबद्दल इतकी घृणास्पद भाषा वापरल्याने चौफेर संतापाची लाट उसळली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलताना जर एखादा पदाधिकारी अशी पातळी सोडून बोलत असेल, तर पक्षातील शिस्त आणि संस्कृती कुठे गेली, असा सवाल उपस्थित केला गेला. प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता जनाक्रोश ओळखून भाजपने शिस्तभंगाची कठोर कारवाई करत चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी केली. परंतु ही बाब केवळ पक्षांतर्गत कारवाईपुरती मर्यादित राहिली नाही. महिला लोकप्रतिनिधींचा अनादर करणारी भाषा वापरल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार पोलिसांनी वेगाने कारवाई करत चौधरी यांना अटक केली.

खरेतर हा विषय हकालपट्टी वा अटकेने मिटणारा नाही. कारण या महाशयांची पक्षातील काटकोनातील प्रगती, त्यांना मिळालेला काही वरिष्ठांचा आशीर्वाद आणि पक्षातील महत्त्वाचे पद मिळाल्यानंतर त्यांनी दाखविलेली आणि केलेली मस्ती यातून पक्षाचा मुखवटा गळून पडला असल्याने यावर अधिक गांभार्याने चर्चा व्हायला हवी. चौधरींसारखी अशी किती माणसं भाजपला आतून पोखरत आहेत, याची किमान यानिमित्ताने तरी छाननी व्हावी, अशी विनंती भाजपच्याच एका जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याने व्यक्त केली. त्याच्या म्हणण्यानुसार, आजही अशी अनेक बांडगुळं आहेत की ज्यांची छाटणी तातडीने करायला हवी. प्रश्न मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण याचा आहे.

विजय चौधरी हे खरे तर चंद्रशेखर बावनकुळे यांचे बोट धरून वर आलेले आहेत. अंमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी असलेल्या भाऊबंदकीत अडकून विजय चौधरींनी त्यांना प्रचंड त्रास दिल्याचे सांगितले जाते. त्याचा बदला म्हणून नंतरची सुडाची कारवाई झाल्याचीही चर्चा आहे. विजय चौधरी जसजसे सर्वार्थाने प्रगती करीत गेले तसतशी त्यांची भाषा, वर्तन यात बदल होत गेला. लिक झालेल्या ऑडिओतील त्यांची भाषा ऐकल्यावर साधारण या माणसाची काय लायकी आहे, ते कोणालाही कळू शकेल. तर अशा माणसाला भाजपने बराच काळ डोयावर घेतले. या काळात त्यांनी अनेकांना पायदळी तुडविले. स्वीय सहायकाला हाकलून दिल्यानंतर त्याचा तुटपुंजा पगारही नाकारण्याची चूक त्यांना भलतीच महागात पडली. या सहायकाने पगाराच्या बदल्यात चौधरींचा मोबाईल नेला आणि त्यात त्याला खजिनाच सापडला.

चौधरी व भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या संवादाच्या लिप्स त्याला मिळाल्या आणि त्याने त्याच्या अपमानाचा पद्धतशीर बदला घ्यायला सुरुवात केली. या लिप्स त्याने काहींना विक्री केल्याचे आता सांगितले जात आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहेच; पण चौधरींविरोधात पक्षाच्याच माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी गंभीर तक्रार केल्यानंतर पक्ष जागा झाला. चौधरींची हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांना अटक झाली. आता पुढे काय हा प्रश्न उरतोच. कारण अशी माणसं कोणत्या निकषाच्या आधारे वरपर्यंत जातात याची छाननी पक्ष आता तरी करणार आहे का.. एखादा गॉडफादर पकडायचा आणि आपला मार्ग निर्वेध करायचा ही खास प्रगतीची वाट सध्या सर्वच राजकीय पक्षांत सुसाट सुटली आहे. त्याला आळा घालण्याची सुबुद्धी पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला कधी येणार आहे का? पक्षातील लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते आदींसाठी नित्यनियमाने संस्काराचे वर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत घेतले जातात. त्यातून नेमके कोण काय शिकतो, याचाही पाठपुरावा यानिमित्ताने घ्यायला हवा. विजय चौधरींच्या प्रकरणाच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत राजकारणाची दिशा किती स्वैर, उथळ आणि सूडमय आहे याचे दर्शन झाले. किमान यापुढे तरी संस्काराच्या गप्पा या मंडळींनी मारू नये हेच चांगले.

मो. ९३२५३८३०९२

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पाेलिसांनी काढली टवाळखोरांची हवा! सोशल मीडियावर ‘भाईगिरी’ची नशा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik गल्लीबोळात चार-पाच काडीमोडी पोरांना एकत्र करून, इन्स्टाग्रामवर रील्स टाकून स्वतःला हिराे समजणाऱ्या टवाळखोरांना नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) दणका...