अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत प्राथमिक सहमतीचे दर्शन घडले. या प्रक्रियेसाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संगमनेरमधील बैठक ही जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल मानले जात आहे.
दरम्यान, बँकेच्या 21 संचालकपदांच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत 21 पैकी तब्बल 17 जागा बिनविरोध झाल्या होत्या. केवळ चार जागांवर सहमतीच्या राजकारणातच दोस्तीत कुस्ती रंगली होती. यंदाही त्याच धर्तीवर निवडणुकीचा फॉर्म्युला राहणार आहे. यासाठी जनरल प्रवर्गातील सात जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये सहमती होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असून 5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी होईल. 7 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींना अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यानंतर अधिक वेग येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि बँकेच्या हिताचा मुद्दा पुढे करत बँक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महिला राखीव दोन, शेतीपूरक व बिगरशेती मतदारसंघातील प्रत्येकी एक, ओबीसी आणि एनटी प्रत्येकी एक तसेच अनुसूचित जाती-जमातीची एक, अशा सात जागांवर सहमतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. या सात जागांपैकी चार जागा उत्तर नगर जिल्ह्याच्या, तर तीन जागा दक्षिण नगर जिल्ह्याच्या वाट्याला येणार असल्याची चर्चा आहे. मागील पंचवार्षिकमध्ये उत्तर जिल्ह्यातील चार जागांवर आशुतोष काळे, अमित भांगरे, करण ससाणे आणि गणपतराव सांगळे यांना संधी मिळाली होती. दक्षिण भागातून अनुराधा नागवडे, आशा तापकीर आणि प्रशांत गायकवाड संचालक झाले होते. यापैकी गायकवाड यांची निवड बिगरशेती मतदारसंघातून झाली होती. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही जनरलच्या सात जागांवर सहमतीचा फॉर्म्युला कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, या जागांवर यंदा कोणत्या नेत्यांच्या समर्थकांना संधी मिळणार, यावरून सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मोठ्या गडाखांच्या हाकेनंतर बिनविरोधची चर्चा
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी यापूर्वीच मांडली आहे. त्यानंतर जिल्ह्यात बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली. रविवारी संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीने या चर्चेला प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेचे स्वरूप मिळाल्याचे चित्र आहे. जिल्हा बँक ही शेतकरी, ठेवीदार आणि कर्जदारांशी थेट जोडलेली संस्था असल्याने निवडणुकीतील संघर्षाचा परिणाम सहकार क्षेत्रावर होऊ नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांसमोरील आर्थिक अडचणी वाढत असताना बँकेच्या निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च आणि राजकीय संघर्ष टाळण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
पहिली पायरी पार; पुढील कसोटी तालुकानिहाय चर्चांची
संगमनेर येथील बैठक ही बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने पहिली पायरी ठरली असली, तरी अंतिम निर्णयासाठी अजून मोठी राजकीय कसरत बाकी आहे. तालुकानिहाय इच्छुकांची संख्या, विद्यमान राजकीय समीकरणे आणि प्रतिनिधित्वाचा तिढा सोडविताना सर्व गटांची सहमती मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे आता संगमनेरच्या बैठकीनंतर होणार्या तालुकानिहाय बैठकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चर्चांमधून बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येतो की निवडणुकीची चुरस कायम राहते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
सहमती एक्सप्रेसचा फॉर्म्युला
सूत्रांच्या माहितीनुसार, जनरलच्या सात जागांपैकी भाजपमधील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे गटाला तीन जागा, महाविकास आघाडीतील बाळासाहेब थोरात गटाला दोन जागा, तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला प्रत्येकी एक जागा देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र, हा फॉर्म्युला प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत कायम राहतो का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः शिंदे गटाच्या वाट्याला येणार्या जागेवर कोणाला संधी मिळते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
संगमनेरात सर्वपक्षीय सहमतीआणि थोरातांना अधिकार
रविवारी संगमनेरमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नगर जिल्ह्याचा या पूर्वीचा सहकाराचा इतिहास पाहता जिल्हा बँकेत समझोता व्हावा, अशी सर्वपक्षीय नेत्यांनी भावना व्यक्त केली. जिल्हा बँक बिनविरोध व्हावी, यासाठी ही प्राथमिक आणि पहिली बैठक आहे. लवकरच तालुकानिहाय चर्चा करून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, यासाठी संगमनेरमध्ये ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय सहमती दर्शवण्यात आली. तसेच या बिनविरोधच्या प्रक्रियेचे सर्व अधिकार हे ज्येष्ठ नेते थोरात यांना जिल्ह्याच्यावतीने देण्यात आले. रविवारी संगमनेरला झालेली बैठक ही जिल्हा बँक बिनविरोधच्यादृष्टीने पहिली पायरी आहे. या पुढील काळात तालुकानिहाय चर्चा झाल्यावर जिल्हा बँकेच्या बिनविरोधसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य तालुक्यातील नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आत्मकेंद्री राजकारण झाल्यासबिनविरोध शक्य नाही : शिंदे
जिल्हा सहकारी बँक ही आशिया खंडातील महत्त्वाची सहकारी बँक असून, तिची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मांडली आहे. त्यानंतर बँकेच्या निवडणुकीबाबत बिनविरोधचे वातावरण निर्माण होत असल्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले. बँक ही केवळ राजकीय संस्था नसून ठेवीदार आणि कर्जदारांच्या हिताशी संबंधित महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करायची असेल तर व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून सर्वांचा मान-सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. आपल्या पूर्वजांनी ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली. आता ठेवीदार आणि कर्जदारांचे हित लक्षात घेऊन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यासाठी आपापसातील सुंदोपसुंदी आणि जीरवाजीरवी बाजूला ठेवून सर्वांचा सन्मान राखला पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, कोणत्याही एका व्यक्तीभोवती किंवा व्यक्तिगत राजकीय हिताभोवती प्रक्रिया केंद्रित झाली, तर बिनविरोध निवडणुकीचा मार्ग अडचणीचा ठरू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. कोणी आत्मकेंद्री होऊन केवळ स्वतःचा विचार करून राजकारण केले, तर जिल्हा बँक बिनविरोध होणार नाही, असे शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता सांगितले.
नव्या चेहर्यांचे लाँचिंग कोणाचे ?
यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत सहकाराच्या राजकारणात काही नव्या चेहर्यांना संधी मिळण्याची चर्चा आहे. संगमनेर, राहाता, राहुरी, शेवगाव, पारनेर, जामखेड आणि नगर तालुक्यांतील सोसायटी मतदारसंघांसह जनरलच्या सात जागांपैकी काही जागांवरही नव्या नेतृत्वाला संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.त्यामुळे विद्यमान संचालकांपैकी कोणाला पुन्हा संधी मिळणार आणि कोणत्या नव्या चेहर्यांचे जिल्हा बँकेच्या राजकारणात लाँचिंग होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असतानाच सहमतीच्या चर्चेलाही वेग आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्जांमधून सहमतीचा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरतो की काही जागांवर निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते, हे स्पष्ट होणार आहे.




