मुंबई | प्रतिनिधी
महसूल विभागातील कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी होणारी नागरिकांची धावपळ कमी करण्यासाठी राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरसह ९ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी या निर्णयाची माहिती दिली. ही नवी कार्यालये नाशिक आणि नागपूर विभागातील आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे अपर तहसीलदार कार्यालय होणार आहे. तर जळगाव जिल्ह्यात जळगाव (शहर), जामनेर तालुक्यातील पहूर आणि चाळीसगाव अशी तीन नवीन कार्यालये होतील. तसेच नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तसेच शहादा आणि धुळे जिल्ह्यात शिरपूर (शहर) येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित केली जाणार आहेत.
नागपूर विभागातील सावनेर तालुक्यासाठी मौजे चिचोली (खापरखेडा) आणि गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातील आष्टी येथे नवीन कार्यालये उभी राहणार आहेत.
या नव्या कार्यालयांमुळे जमिनीशी संबंधित महसूली कामांसाठी लोकांना लांबचा प्रवास करावा लागणार नाही. त्यांना नेमून दिलेल्या भागातील महसूली अधिकार आणि कामे तिथेच मिळतील. मात्र निवडणूक, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर महसूली नसलेली कामे मूळ तहसीलदार कार्यालयामार्फतच चालतील. तशी अर्ज किंवा निवेदने नव्या कार्यालयात आल्यास ती पुढील कार्यवाहीसाठी मूळ तहसीलदार कार्यालयाकडे पाठवली जातील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
नव्या अपर तहसीलदार कार्यालयांमुळे जमिनीशी आणि महसुलाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना आपल्या भागातच जलद तसेच पारदर्शक सेवा मिळू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




