Tuesday, November 24, 2026
HomeनाशिकNashik Crime News : पंचवटीत कोयत्याचा धाक, गंगापूर रोडवर मोबाइल हिसकावला; अवघ्या...

Nashik Crime News : पंचवटीत कोयत्याचा धाक, गंगापूर रोडवर मोबाइल हिसकावला; अवघ्या सव्वा तासात दोन ठिकाणी जबरी चोरी

सीसीटीव्हीनुसार तपास

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील गजबजलेल्या पंचवटी तसेच गंगापूर रोड परिसरात (Panchvati and Gangapur Road Area) रविवारी (दि. २२) सायंकाळी अवघ्या सव्वा तासाच्या अंतराने जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या. पंचवटीतील कपालेश्वर मंदिराच्या पाठीमागे एका हॉटेल व्यावसायिकाच्या मानेवर कोयता लावून रोकड लुटण्यात आली, तर गंगापूर रोडवर दुचाकीस्वार तिघांनी एका विद्यार्थिनीकडील ६० हजार रुपयांचा महागडा मोबाइल हिसकावून पळ काढला. घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, पोलिसांच्या (Police) गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

पहिली घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पंचवटीतील कपालेश्वर मंदिराच्या (Kapaleshwar Temple) पाठीमागील रस्त्यावर घडली. द्वारका परिसरात नाश्त्याचे हॉटेल चालवणारे गणेश गजानन हिरडकर (वय २९, रा. प्रज्ञानगर, जुने नाशिक) हे नेहमीप्रमाणे कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून खांदवे सभागृहाकडून रामकुंडाकडे पायी जात असताना त्यांच्या ओळखीचे संशयित रोहित कुदळे आणि शुभम हरगावकर हे दोन अनोळखी साथीदारांसह तिथे आले.

​संशयितांनी (Suspected) गणेश यांना रस्त्याच्या कडेला नेऊन धक्काबुक्की केली. दोन अनोळखी इसमांनी त्यांना पकडून ठेवले, तर रोहित आणि शुभम यांनी कमरेला लावलेले कोयते बाहेर काढून थेट गणेश यांच्या मानेवर लावले. यानंतर रोहित कुदळे याने त्यांच्या खिशातील ८ हजार ५०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली, तर शुभम हरगावकर याने कोणाला काही सांगितल्यास जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली.

यानंतर चौघेही कपालेश्वर मंदिराच्या दिशेने पसार झाले. या प्रकारामुळे घाबरलेले हिरडकर सुरुवातीला घरी गेले; मात्र आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मध्यरात्री पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी चौघांविरुद्ध जबरी चोरी व शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील हरगावकर हा सराईत आहे. दोन्ही घटना सायंकाळी ५ ते ६.३० या वर्दळीच्या वेळेत घडल्याने चोरट्यांची हिंमत वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पंचवटी आणि गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयितांचा शोध सुरु आहे.

​गंगापूर रोडवर विद्यार्थिनी लक्ष्य

पंचवटीतील घटनेला सव्वा तास उलटत नाही तोच सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर दुसरी घटना घडली. मूळची मुंबईची आणि सध्या द्वारका येथे वास्तव्यास असलेली अनुश्री एस. पोचे ही विद्यार्थिनी गंगापूर रोडवर शिक्षण घेत असून, एका शाळेजवळील एका दुकानात काम करते. सायंकाळी दुकानाबाहेर आल्यानंतर ती मोबाइल पाहत पायी जात होती. यावेळी एकाच दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांपैकी मध्ये बसलेल्या चोरट्याने संधी साधत तिच्या हातातील सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावला आणि तिघेही धूम ठोकून पसार झाले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्या

सुप्रिया

शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातम्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, हे जनता ठरवणार…

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आला आहे. पक्षातील राजकीय घडामोडी, पवार यांच्या...