मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभाग अधिकार्यांच्या पथकासमोरच हृदयविकाराच्या त्रासाने प्रा. सोपान बोरसे यांचा मृत्यू झाला. अधिकार्यांनी चौकशीच्या नावाखालीच मानसिक त्रास दिल्याने हा प्रकार घडल्याची फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षण उपसंचालक संजय राठोड, प्रशासक तानाजी घोंगडे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे यांच्यासह अन्य एक अशा पाच जणांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, प्रा. सोपान बोरसे यांचा चौकशी अधिकार्यांच्या दडपशाहीने मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ व त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज म. गांधी विद्यामंदिर संचलित सर्व शाळा-महाविद्यालयांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. दुपारी प्रा. बोरसे यांच्या पार्थिव देहावर वजीरखेडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले गेले. यावेळी झालेल्या शोकसभेत दोषी अधिकार्यांना अटक करीत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांच्या नेत्यांतर्फे दिला गेला.
प्रा. सोपान बोरसे यांचा अधिकार्यांतर्फे चौकशीच्यां नावाखाली मानसिक त्रास दिला जात असल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त शिक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईक तसेच शिक्षकांनी घेतला होता. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुंजाळ यांनी याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच मृत बोरसे यांचे बंधूंनी फिर्याद दाखल केल्याने रात्री उशीरा पोलिसांनी याप्रकरणी पाच अधिकार्यांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याने संतप्त शिक्षकांनी आंदोलन स्थगित करत मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी वजीरखेडे स्मशानभुमीत प्रा. बोरसे यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले गेले.
प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे बंधू प्रविण बोरसे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालयात सोपान बोरसे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. या शाळेत प्रशासक म्हणून तानाजी घोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोंगडे हे दर दोन दिवसांनी चौकशीच्या निमित्ताने शाळेवर येवून भावास अपमानास्तपद वागणूक, दमबाजी तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने तो मानसिक तणावात होता. मंगळवारी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व शिक्षण उपसंचालक संजय राठोड यांच्या आदेशावरून गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नाशिक यांच्यासह चार जणांचे पथक शाळेत प्रशासकीय चौकशीसाठी आले होते.
यावेळी या अधिकार्यांनी सोपान याचा काहीही एक संबंध नसतांना त्याच्याकडे शाळेचे हजेरीपट मागविले व ते दिल्यानंतर अधिकार्यांनी सोपान यास दमबाजी करत या शाळेत कशी नोकरी करतो अशी धमकी दिली. यानंतर तो वर्गावर गेला असतांना परत बोलवून चौकशीच्या नावाखाली भावाला अपमानित केले गेले. यामुळे उद्भवलेल्या तणावातूनच त्यास हृद्यविकाराचा झटका आल्याने तो शाळेत कोसळला. आपल्यासह शिक्षकांनी त्यास रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
चौकशीच्या नावाखाली प्रशांत दिग्रसकर, संजय राठोड, तानाजी घोंगडे, निलेश पाटोळे व इतर पथकातील अधिकार्यांनी सोपान यास मानसिक त्रास देत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत अनमानीत केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याने हे अधिकारी सोपान बोरसे याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे प्रविण बोरसे यांनी फिर्यादीत नमूद केल्याने शहर पोलिसांनी या पाचही अधिकार्यांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.




