मुंबई | प्रतिनिधी Mumbai
ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सहकार विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात राज्यातील २०० हून अधिक साखर कारखाने सुरु होऊन १०० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
राज्य सहकारी साखर संघाकडे विविध साखर कारखान्यांनी १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान गाळप हंगाम सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु, देशभरात साखरेचे दर वाढल्याने सणासुदीच्या काळात ग्राहकांना त्याची झळ बसू नये, यासाठी यंदा गाळप हंगाम लवकर सुरु करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. शेजारील कर्नाटक राज्यात साखर कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात उसाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी १५ ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना प्रति वर्षी २०० कोटी याप्रमाणे पुढील सात वर्षासाठी १४०० कोटी रुपयांचे सुलभ कर्ज देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या कर्जातून कारखान्यांना व्याज सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.
बैठकीत सन २०२५-२६ गाळप हंगामाचा आढावा, देशातील साखर साठा, थकीत एफआरपी आणि आरआरसी, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल पुरवठा, ऊस क्षेत्र आणि उत्पादन, साखर निर्मिती तसेच २०२६-२७ च्या गाळप हंगामाची पूर्वतयारी, हंगामनिहाय एफआरपी आणि एमएसपी, साखर उद्योगाशी संबंधित शासनाच्या विविध उपक्रमांसाठी कारखान्यांकडून करण्यात येणाऱ्या कपातीचे धोरण आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या निधी कपातीचा आढावा याबाबत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी बैठकीत सादरीकरण केले.




