नवी दिल्ली | संदीप वाकचौरे| New Delhi
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्लीत जाणार्या रसिकांसाठी स्वतंत्र महादजी शिंदे रेल्वे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रेल्वेमधून महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध कवी, लेखक, नाटककार, कलाकार यांनी विविध कार्यक्रम सादर करून साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मोठी रंगत आणली. या साहित्य संमेलनामध्ये संयोजकांच्या वतीने रसिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काल सर्व बोगीमध्ये संयोजकांनी ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. पुण्यातून रेल्वे सुटण्यापूर्वी फलाट क्रमांक एक वर साहित्य दिंडी काढण्यात आली.
या ठिकाणी विविध कलाकारांनी आपल्या लोककला सादर केल्या. टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये वारकर्यांनी फलाट क्रमांक एकवर सांप्रदायिक अभंग सादर करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तद्नंतर राज्य शासनाचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी सर्व रसिकांचे स्वागत करून त्याचे संमेलनाच्या अनुषंगाने भूमिका मांडली. त्यानंतर रेल्वेला झेंडा दाखवून रसिकांच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या. मंत्री उदय सामंत यांनी रसिकांच्या सोबत पुणे ते अहिल्यानगर असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी बोगीत सुरू असणार्या विविध साहित्य संमेलनातील कार्यक्रमाला उपस्थित राहून रसिकांच्या सोबत संवाद साधला.
या संमेलनामध्ये अनेक कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थित रसिकांची वाह वाह मिळवली. एखाद्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अशा स्वरूपाचे चालत्या चाकावर संमेलन आयोजित करण्याचे हे पहिलेच संमेलन आहे. फिरत्या चाकावरच्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शरद तांदळे हे उपस्थित आहे.अनेक रेल्वे बोगीमध्ये विविध कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवून दाद देणे सुरू होते. यात पुरुषाबरोबर महिलांचाही सहभाग अधिक होता.