Sunday, May 4, 2025
Home Blog Page 3

Nashik Accident News : म्हसरुळला हिट ॲण्ड रन; महिला ठार

0

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

म्हसरुळ (Mhasrul) येथील आरटीओ कॉर्नर (RTO Corner) येथील सिग्नलचे पालन करणाऱ्या वाहनधारकांवर चालकाने भरधाव पिकअप चढविल्याची हृदयद्रावक घटना घडली. त्यात जयश्री संजय सोनवणे (वय २३, रा. कलाश्री सोसायटी, दिंडोरीरोड, पंचवटी) यांचा मृत्यू (Deatj) झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असून यात चार ते पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत म्हसरुळ पोलिसांत (Mhasrul Police) प्राणांतिक अपघातासह मोटार वाहन अधिनियमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हितेश संजय सोनवणे (वय ३०, रा. कलाश्री सोसायटी) हे गुरुवारी (दि. १) सकाळी पावणेबारा वाजता बहीण जयश्री हिच्यासह दुचाकीवरुन शालिमारकडे जात होते. त्याचवेळी इतर वाहनधारकही सिग्नलचे पालन करत होते. त्याचवेळी दिंडोरी रोडने नाशिककडे येणाऱ्या पिकअप (एमएच १५ एचएच ७३०३) वरील संशयित चालक अनिल मच्छिंद्र साळवे (वय ३२, रा. रामेश्वर नगर, दिंडोरीरोड) याने पिकअप बेदरकारपणे चालवून सिग्लनवरील चार ते पाच दुचाकी व कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.

दरम्यान, या झालेल्या अपघातात (Accident) गंभीर दुखापत झाल्याने जयश्री यांचा मृत्यू झाला. तर, हितेश सोनवणे आणि जयदेव लक्ष्मण महाले (वय २१, रा. साईदर्शन कॉलनी ता. जि. धुळे), घनःश्याम भरत महाले (वय १९, रा. वरखंडी, ता. दिंडोरी) हे जबर जखमी झाले. पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) हितेश यांनी अनिल साळवेविरोधात फिर्याद (FIR) दाखल केली असून तपास उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत.

Nashik Crime : दोन तडीपार गुंडांमध्ये वाद; जेलरोडला एकाचा खून, मित्र जखमी

0

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील जेलरोड परिसरात (Jail Road) मागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन तडीपार गुंडांमध्ये वाद झाल्याने या वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले. त्यानंतर एकाने दुसऱ्यावर धारदार हत्याराने (Sharp Weapon) हल्ला केल्याने या हल्ल्यात एक जण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे नाशिकरोडच्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

सदरचा प्रकार हा गुरुवार दिनांक एक मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरातील मोरे मळा (More Mala) बालाजीनगर येथे घडला तर संशयित आरोपी हा स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. जेलरोड भागातील मोरे मळा येथे राहणारा संशयित गुन्हेगार नीलेश पेखळे हा गुरुवारी रात्री घराजवळ उभा असताना त्याचाच तडीपार असलेल्या गुन्हेगार मित्र हितेश डोईफोडे व त्याचा मित्र बंटी बंग दोन्ही (रा. सानेगुरुजीनगर, महाजन हॉस्पिटल मागे जेलरोड) येथे मोरे मळा परिसरात आले.

त्यानंतर निलेश आणि हितेश यांचा मागील कारणावरून वाद झाला व दोघेही एकमेकांवर धावून गेले. या दरम्यान नीलेश याने धारदार हत्याराने हितेश याच्यावर हल्ला केला असता हितेश याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला तसेच मित्र बंटी मध्यस्थी करण्यासाठी आला असता नीलेश याने त्याच्यावर देखील हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान निलेश व त्याचे आणखी दोन मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. या घटनेत हितेश याला वर्मी घाव लागल्याने निलेश याने त्याच्या चारचाकी वाहनात हितेश याला घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले.

मात्र या दरम्यान हितेश याचा मृत्यू (Death) झाल्याचे लक्षात येताच निलेश याने तेथून पळ काढला व थेट नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून स्वतः पोलिसांसमोर हजर झाला व झालेली घटना सांगितली. तर बंटी हा देखील गंभीर जखमी झाल्याने त्यास मनपाच्या बिटको रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी दाखल केले आहे. या घटनेने नाशिकरोड व जेलरोड परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी निलेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे करत आहे.

GST News : जीएसटी संकलन २.३७ लाख कोटी; एप्रिलमध्ये आठ वर्षांनंतर प्रथमच विक्रमी पातळी

0

नवी दिल्ली | New Delhi

नुकत्याच संपलेल्या एप्रिल महिन्यात देशातील जीएसटी संकलन (GST Collection) प्रथमच विक्रमी २.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्यावर्षीच्या याच महिन्यातील २.१० लाख कोटी रुपयांपेक्षा ते १२.६ टक्क्यांनी जास्त आहे. २०१७ मध्ये जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर एप्रिल २०२५ मधील संकलन सर्वाधिक ठरले आहे. जीएसटी संकलनातील ही वाढ सरकारी कायदे आणि प्रणालींच्या पालनाने शक्य झाल्याचा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) सरकारने आर्थिक वर्षासाठी जीएसटी महसुलात ११ टक्के वाढ अपेक्षित धरली होती. जीएसटी संकलनातून ११.७८ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. या अंदाजात केंद्रीय जीएसटी आणि भरपाई उपकरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. केंद्र सरकारने नुकत्याच संपलेल्या एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपये होते.

१ जुलै २०१७ ला नवी करप्रणाली (Tax) लागू झाल्यानंतरचे हे दूसरे सर्वाधिक जीएसटी संकलन होते. या वर्षी एप्रिल महिन्यात देशांतर्गत व्यवहारांतून जीएसटी संकलन १०.०७ टक्क्‌यांनी वाढून ते १.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आयात वस्तूंवरील कर २०.८ टक्क्यांनी वाढून तो ४६,९१३ कोटी रुपये झाला आहे. एप्रिलमध्ये जारी केलेल्या परताव्याच्या रकमेत ४८.३ टक्क्यांनी वाढ होऊन ती २७, ३४१ कोटी रुपये झाली आहे. चालू वर्षी मार्चमध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ९.९ टक्क्यांनी वाढून १.९६ लाख कोटी रूपये झाले.

दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीत नोंदवलेल्या १.८४ लाख कोटी रुपयांच्या कर संकलनापेक्षा टप्प्याटप्प्याने जीएसटी संकलन ६.८ टक्क्यांनी जास्त होते. मार्चमध्ये एकूण जीएसटी महसुलात सीजीएसटी (केंद्रीय जीएसटी) तून ३८,१०० कोटी, राज्य जीएसटीतून ४९,९०० कोटी, एकात्मिक जीएसटीतून ९५,९०० कोटी रुपये तर भरपाई उपकरातून १२,३०० कोटी रुपये समाविष्ट होते.

पाच राज्यांतून सर्वाधिक कर

फेब्रुवारीत सीजीएसटी संकलन ३५,२०४ कोटी, राज्य जीएसटी ४३,७०४ कोटी, एकात्मिक जीएसटी ९०,८७० कोटी आणि भरपाई उपकर १३,८६८ कोटी रुपये होते. मार्चमध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा पहिल्या पाच राज्यांत समावेश होता. महाराष्ट्राने मार्चमध्ये ३४,५३४ कोटी रुपये दिले. गेल्या वर्षीच्या मार्चपेक्षा ते १४ टक्क्यांनी जास्त आहे.

जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

0

जळगाव – Jalgaon
संभाव्य महानगरपालिका निवडणुका आणि येणारे सण लक्षात घेता जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू शकते हे लक्षात घेवून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.

दि.३ मे २०२५ रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते दि.१६ मे २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीत जमावबंदी लागू राहील. या कालावधीत पाच किंवा अधिक लोकांनी जमणे, सभा, मिरवणूक घेणे, शस्त्र बाळगणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर ठेवणे, चित्रांचे दहन, अशांतता पसरविणारे वर्तन किंवा साहित्य तयार करणे, प्रसारित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अलीकडील घटनांमुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, ८ मे ते १६ मे दरम्यान विविध सण, जयंती, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशांतर्गत वयोवृद्ध, अपंग व वैद्यकीय कारणास्तव लाठी किंवा तत्सम सहाय्यक साधनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा व विवाह मिरवणुकांवर हा आदेश लागू होणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.

PM Narendra Modi : “ठोस आणि निर्णायक कारवाईसाठी…”; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना इशारा

0

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi  

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दि.२२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, दहशतवाद्यांना धडा शिकविण्याची मागणी केली जात आहे. तसेच जगभरातून देखील भारताला पाठिंबा मिळत आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्यांवर निशाणा साधत पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (शनिवारी) हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोन्साल्विस लॉरेन्को (Joao Manuel Goncalves Lourenco) यांची भेट (Meet) घेतली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेत दहशतवादाच्या मुद्द्यावरुन चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले की, मी राष्ट्रपती लोरेन्सू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात मनापासून स्वागत करतो. हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे म्हटले.

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,”दहशतवाद्यांना (Terrorists) पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे, यावर आमचे एकमत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल राष्ट्रपती लॉरेन्को आणि अंगोला यांनी व्यक्त केलेल्या शोकसंवेदनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, अंगोला (Angola) या देशाला भारत सैन्य प्रशिक्षण आणि आधुनिकीकरणासाठी मदत करत आहे. तसेच अंगोला लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी भारत २०० लक्ष डॉलरची मदत करणार आहे. अंगोलाच्या सशस्त्र दलाला प्रशिक्षण देण्यात भारताला मदत करण्यात आनंद होईल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तर दोन्ही देशांच्या संबंधाला आता ४० वर्षे पूर्ण झाली असून, अंगोलाच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताने (India) मदत केली आहे.

 

Rohit Pawar : हा बघा कोयता गँगचा कालचा थरार! रोहित पवारांनी ‘तो’ शेअर केला व्हिडीओ

0

पुणे । Pune

पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा उग्र चेहरा समोर आला आहे. बिबवेवाडीत दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून, यामध्ये कोयत्याचा वापर करण्यात आला आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रस्त्यावर उभ्या चारचाकी वाहनांजवळ काही तरुणांमध्ये आधी बाचाबाची सुरू झाली. अचानक एका तरुणाने हातातील कोयता काढून दुसऱ्या गटातील व्यक्तीवर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे एका तरुणाचा शर्ट फाटला, तर दुसरा तरुण रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी दुसऱ्या गटातील आणखी एक तरुण हातात सपाट दगड घेऊन भिरकावतानाही दिसून आला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हाणामारीनंतर दोन्ही गटातील तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः कोयत्याचा उघडपणे वापर होत असल्यामुळे ‘कोयता गँग’चा पुनरुज्जीवन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे लक्ष वेधत त्वरीत कारवाईची मागणी केली आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1918505998366499021

आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, “पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!,”

IPL 2025 : आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये लढत; RCB ला विजय अनिवार्य

0

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (शनिवारी) चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Chennai Super Kings and Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून, यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळूरु आमनेसामने येणार आहेत.

चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम वर झालेल्या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात बंगळूरु संघाने चेन्नई सुपरकिंग्ज विरूध्द ५० धावांनी दणदणीत विजय (Win) संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी चेन्नई सुपरकिंग्जकडे असणार आहे. उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी बंगळूरु (RCB) संघाला विजय अनिवार्य असणार आहे.

दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघांसाठी (CSK) पुढील ५ सामने नॉकआऊट असणार आहेत. आणखी एक पराभव झाल्यास स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि बंगळूरुमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ३५ सामने खेळविण्यात आले असून, चेन्नई सुपरकिंग्ज ने २२ तर बंगळूरुने १२ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना रद्द करण्यात आला आहे. बंगळुरू येथे दोन्ही संघांमध्ये ११ सामने खेळविण्यात आले असून, दोन्ही संघांनी ५-५ विजय संपादन केले आहेत.

Sanjay Shirsat : “गरज नसेल तर खाते…”; लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने मंत्री शिरसाट संतापले

0

मुंबई | Mumbai 

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Government) आणण्यात गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सरकारसाठी आता अडचणीची ठरताना पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी लागणारा निधी सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice Department) खात्यातून वळवला जात असल्याचे समोर आले आहे. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला असून, सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा, असे म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat) माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, “लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वाचारशे कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला असून याची मला काहीच कल्पना नाही. मी वारंवार सांगत आहे की असे करता येणार नाही पण निधी वर्ग केला जात आहे. सामाजिक न्याय खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खातेच बंद करून टाका. हा अन्याय आहे की कट हे मला माहीत नाही. मात्र, या विषयावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी बोलणार आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “सामाजिक न्याय खाते हे दलित वर्गासाठी आहे, पहिलाच निधी अपूर्ण पडत आहे. अर्थ विभागाकडून मनमानी सुरु असून, ते बरोबर नाही. आदिवासी खाते, सामजिक न्याय खाते कशासाठी आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाही का? माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. याबद्दल काही नियम आहेत का नाही?
माझ्या खात्याचे दायित्व जवळपास १५०० कोटी रुपयांचे (Money) आहे. असा निधी गेला तर मग उरलं काय? असं झालं तर विद्यार्थांच्या शिष्यवृ्त्तीला उशीर होईल, जेवणाचे पैसे उशीरा पोहोचतील. अशाने हा विभाग विस्कळीत होईल. मला वाटतं असं होऊ नये यासाठी माझे प्रयत्न असतील”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी वळवला?

लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) आदिवासी विकास विभागाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात ३२४० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ३३५.७० कोटी इतका निधी महिला व बाल विकास विभागास वळवण्यात आला आहे. तर सामाजिक न्याय विभागाच्या ३९६० कोटी निधीपैकी ४१०.३० कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत.

 

 

 

Shirdi News : ईमेलचा पत्ता चुकला अन् बॉम्बस्फोट धमकीचा धक्का शिर्डीला बसला

0

शिर्डी । प्रतिनिधी| Shirdi

तामिळनाडूतील एका साई मंदिराला पाठवण्यात आलेल्या धमकीवजा ई-मेलचा धक्का शिर्डी साई संस्थानलाही बसला. परदेशातून पाठवलेला हा ई-मेल चुकून शिर्डी साई संस्थानच्या अधिकृत ई-मेलवरही पोहोचला. मेलमध्ये साई मंदिरावर विनाशकारी पाइप बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे शिर्डीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वीही साई संस्थानला असे फेक मेल आलेले आहेत.

शुक्रवारी 2 मे दुपारी तीन वाजेपर्यंत साईमंदिर बॉम्बने उडविण्याचा इशारा मेलद्वारे देण्यात आला होता. या प्रकरणी साई संस्थानच्या वतीने सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ई मेलमध्ये सावुक्कू शंकर आणि जमिश मुबीन यांच्या फाशीच्या निषेधार्थ हल्ल्याची योजना असून यासाठी स्फोटके वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा ई मेल मूळत: तामिळनाडूतील साई मंदिरासाठी पाठवण्यात आला होता. तो चुकून शिर्डी संस्थानकडेही आला. त्यामुळे हा मेल फेक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ढिलाई न ठेवता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत तमिळनाडू प्रशासनालाही माहिती दिली आहे.

मंदिर परिसराची कसून तपासणी
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करत आहेत. गेले दोन दिवस अहिल्यानगर व शिर्डीच्या बॉम्ब शोध पथकाने अनेकदा मंदिर व परिसरची कसून तपासणी केली. मात्र संशयास्पद काहीही आढळले नाही.

साईदर्शन सुरळीत
मंदिर परिसरात जलद कृती दल व पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. भाविकांच्या मोबाईल, बॅगा काळजीपूर्वक तपासण्यात येत आहेत. शहरात नाकाबंदी लावण्यात आली असून हॉटेलचीही तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे संगितले. पोलीस आणि संस्थान प्रशासनाने साईभक्त आणि ग्रामस्थांना घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या धमकीमुळे भाविकांवर कोणताही परिणाम झाला नसून नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

Pahalgam Terror Attack : भारताचा पाकिस्तानला दणका; आयात आणि निर्यातीवर घातली बंदी

0

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या हल्ल्याचे चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशारा गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) दिला आहे. दुसरीकडे या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

पाकिस्तानी नागरिकांना (Pakistani Citizen) भारत सोडण्यासह सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला होता. याशिवाय पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठं पाऊल उचलले असून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने (Central Government) परराष्ट्र व्यापार धोरण २०२३ अंतर्गत नवीन पॅरा 2.20A जाहीर करत ही बंदी लागू केली आहे. पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सार्वजनिक धोरणाच्या हिताच्या दृष्टीने लागू करण्यात आली असून, याला अपवाद हवा असल्यास केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता यापुढे कोणतीही वस्तू पाकिस्तानातून भारतात (India) येणार नाही आणि भारतातून कोणतीही वस्तू पाकिस्तानला पाठवली जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने यापूर्वी थेट व्यापार बंद केला होता. पण आता सरकारने सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष व्यापार देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना देखील जारी केली असून, या अधिसूचनेनुसार भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयात-निर्यातीवर (Imports and Exports) तात्काळ बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने अधिसूचनेत नेमकं काय म्हटलंय?

वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भात काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मग ती मुक्तपणे आयात करता येण्याजोगी असो किंवा नसो, पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित असेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल”, असे अधिसूचनेत म्हटले आहे.