Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद महापालिकेने बंद केली 'अभय योजना'

औरंगाबाद महापालिकेने बंद केली ‘अभय योजना’

औरंगाबाद- महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीवर आता लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत ७ महिन्यांत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची ५८ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून घरोघरी मालमत्ता कर मागणीपत्राचे वाटप केले जात आहे. मालमत्ता आणि पाणीपट्टी कराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यावर्षी अभय योजना राबविली जाणार नसल्याचे मनपा प्रशासक तथा आयुक्‍त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावत चालली आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या एलबीटीच्या अनुदानावर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट बिल, कर्जाचा हप्ता दिला जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ७ महिन्यांच्या कालावधीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची ५८ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. करदात्यांना ऑनलाईन सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने सॉफ्टवेअर आणि पोर्टल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासोबतच मालमत्ता कर विभागाचे संगणकीकरण करण्यात आल्यामुळे वसुलीकडे लक्ष देता आलेले नाही. नागरिकांना आता घरबसल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्याची सुविधा लवकरच प्राप्त होणार आहे. त्यामुळे आता मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

- Advertisement -

प्रशासक चौधरी म्हणाले, मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली उद्दिष्ट देण्यात आले असून, हे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत पाच महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी मालमत्ता कर वसुलीसाठी करदात्यांसाठी कोणतीही सूट किंवा अभय योजना राबविली जाणार नाही. घरोघरी मालमत्ता कराच्या मागणीपत्राचे वाटप सुरू आहे. आणखी अनेक भागांत मालमत्ता कराचे मागणीपत्र पोहचलेले नाही. मालमत्ताधारकांकडून कराची वसुली करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांकडे पॉस मशीन दिली जाणार आहे. या मशीनद्वारे कराची रक्‍कम भरता येणार आहे. तसेच वॉर्ड कार्यालयातदेखील कर भरून घेतला जाणार आहे.

करवसुलीचे उद्दिष्ट

चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराचे २०० कोटी रुपये आणि पाणीपट्टीचे १०८ कोटी रुपये असे एकूण ३०८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ५८ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. २५० कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या