Sunday, May 5, 2024
Homeनगरविजेच्या शॉटसर्कीटमुळे भोकर येथे चार एकर ऊस जळून खाक

विजेच्या शॉटसर्कीटमुळे भोकर येथे चार एकर ऊस जळून खाक

भोकर |वार्ताहर|Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे महावितरणच्या दुर्लक्षीतपणामुळे शेतात लोंबकळलेल्या विज वाहक तारा तुटून झालेल्या शॉटसर्कीटमुळे तोडणीला आलेला चार एकर ऊस जळाल्याची दुर्घटना घडली. पहाटे पेटलेला ऊस रस्ता नसल्याने मदत न मिळाल्यामुळे दुपारी अकरा वाजेपर्यंत जळत होता. तोपर्यंत या जळीत क्षेत्राकडे महावितरणचे कुणीही फिरकेले नव्हते. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर परीसरातील शेतकर्‍यांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

भोकर-मुठेवाडगाव रोड लगत गट नं. 491 मधील उज्वला किशोर पटारे यांच्या घरापासून काही अंतरावर चार एकराचे तोडणीला आलेले ऊसाचे क्षेत्र आहे. या परीसरात अनेक ठिकाणी विज वाहक तारा हाताच्या अंतरावर जमिनीकडे लोंबकळल्या आहेत. काल शुक्रवार दि.30 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच ते दुपारी साडेबारा अशी विज पुरवठ्याची वेळ होती.

पहाटे साडेपाच वाजता आलेल्या विज पुरवठ्यानंतर काही वेळात ऊस पेटल्याचा आवाज झाला. हा प्रकार उज्वला पटारे व त्यांचा मुलगा अक्षय यांचे लक्षात आला परंतू अंधारामुळे तीकडे जाणे शक्य नव्हते. विज वाहक तारा कुठे पडलेल्या आहेत हे माहित नव्हते, शिवाय विज पुरवठाही सुरूच होता. त्यामुळे लागलीच मदतीला धावणे शक्य नव्हते.

काही वेळानंतर लगतच्या शेतकर्‍यांनी महावितरणशी संपर्क करून विज पुरवठा खंडीत केला परंतू तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊसाने पेट घेतला हेाता. त्यामुळे मानवी श्रमाने पेटलेला ऊस विझविणे शक्य नव्हते अन् या क्षेत्राकडे रस्त्याअभावी अग्नीशामक जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे सर्वांना बघ्याची भुमिका घ्यावी लागली.

दुपारी अकरा वाजेपर्यंत सर्व चार एकर क्षेत्र जळाल्यानंतर आग शांत झाली. सुदैवाने लगतचे मोठ्या क्षेत्रापर्यंत ही आग न पोहचल्याने उर्वरीत क्षेत्र बचावले. महावितरणने शेतात हाताच्या अंतरावर लोंबकळलेल्या विज वाहक तारा ओढून घ्याव्यात, अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा परीसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या