Thursday, May 2, 2024
Homeनाशिकडॉ. प्रताप दिघावकरांसह समर्थकांचा भाजपत प्रवेश

डॉ. प्रताप दिघावकरांसह समर्थकांचा भाजपत प्रवेश

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

राज्य लोकसेवा आयोग सदस्य व माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी समर्थक लोकप्रतिनिधींसह योग्य वेळी योग्य पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी नार-पार प्रकल्प राबविण्यासह एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या मुंबई, दिल्लीत कॉरिडॉर निर्मितीसह विकासाबाबत त्यांनी केलेली अपेक्षा आगामी काळात पुर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार कटीबध्द राहिल, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

- Advertisement -

मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्य लोकसेवा आयोग सदस्य व नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी बळीराजा आत्मसन्मान संघटनेचे भाऊसाहेब अहिरे, बाजार समिती माजी सभापती कृष्णा भामरे, बाळासाहेब भदाणे, भाऊसाहेब कापडणीस, चारूशिला बोरसे, विक्रम मोरे, वैशाली सुर्यवंशी आदींसह समर्थक लोकप्रतिनिधींसह भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी दिघावकरसह सर्व लोकप्रतिनिधींचे पक्षात स्वागत करतांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. बागलाण आ. दिलीप बोरसे भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार, सटाणा माजी नगराध्यक्ष सुनिल मोरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दिघावकर यांनी समर्थक जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक, सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकार्‍यांसह पक्षात प्रवेश केला आहे. 35 वर्षे सेवा देतांना त्यांची प्रशासनावर पकड होती. या माध्यमातून त्यांनी समाजकल्याणाचे अनेक उपक्रम राबविले आहे. या अनुभवाचा जनहितासाठी पक्षातर्फे उपयोग केला जाईल, असे स्पष्ट करत आ. बावनकुळे पुढे म्हणाले, विकासाबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पक्ष व महायुती सरकारच्या पातळीवर निश्चित पुर्तता करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. दिघावकर यांनी भाजप प्रवेशामागची भुमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली आहे. विशेष म्हणजे अतिरेकी कारवाया थांबत देश विविध क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. त्यामुळे आपण पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेस साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नार-पार पाणीप्रश्न तसेच मुंबई, दिल्लीत कॉरीडॉर यासह विविध विकासाचे प्रलंबीत प्रश्न सुटावेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आश्वासन दिले आहे. पक्ष वाढविण्यासह केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रलंबित विकासाचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. दिघावकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या