Sunday, May 5, 2024
Homeनाशिकनागरिकत्व कायदा लागू करा; आम्ही सेनेसोबत – आशिष शेलार

नागरिकत्व कायदा लागू करा; आम्ही सेनेसोबत – आशिष शेलार

नाशिक | प्रतिनिधी 

लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताने पारित झालेला नागरिकत्व विधेयक कायदा राज्यात लागू करावा अशी विनंती महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी शेलार म्हणाले की, नागरिकत्व कायदा राज्यात अंमलबजावणीसाठी भाजपचे प्रयत्न आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे.  या मुद्द्यावरील शिवसेनेचा पाठींबा इतर पक्षांनी काढला तर भाजप याबाबत सकारात्मक विचार करेल असेही शेलार यांनी म्हटले आहे.

राज्यसभेतून सेनेच्या खासदारांनी विधेयक मंजूर होत होते तेव्हा पळ काढल्याची टीकाही शेलार यांनी याप्रसंगी केली. यावेळीच आमचं ठरलंय म्हणत शेलारांनी गुगली हाणल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

फडणवीस सरकारच्या दत्तक नाशिकबाबत बोलताना शेलार म्हणाले की,  नाशिकच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ३० कोटी रुपयांची मदत केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी या निधीला स्थगिती दिल्याचा आरोप शेलार यांनी याप्रसंगी केला.

हा निधी पुन्हा नाशिकला दिला नाही तर भाजप आंदोलन छेडेल असा इशाराही याप्रसंगी शेलार यांनी दिला. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्याबाबतच्या प्रश्नांवर शेलारांनी मौन बाळगले.  ते म्हणाले खडसे यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष यांनी ऐकली आहे त्यामुळे आपण या विषयावर बोलणार नसल्याचे ते म्हणाले.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा १२ जागांवर पराभव झाला आहे. या मतदार संघात भेट देऊन पराभवाबाबत सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठीना पाठवणार असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या