Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजागतिक महिला दिन : दै. ‘देशदूत’ आयोजित ‘महिलांमधील स्वच्छता व आरोग्य’ या...

जागतिक महिला दिन : दै. ‘देशदूत’ आयोजित ‘महिलांमधील स्वच्छता व आरोग्य’ या विषयावर चर्चासत्र

महिलांच्या स्वच्छतेचा विषय सामाजिक

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

महिलांमधील स्वच्छता हा आता केवळ वैयक्तिक विषय राहिला नसून तो सामाजिक झाला आहे.स्वच्छतेविषयीच्या बदलाचे पहिले पाऊल घरापासूनच सुरू झाले पाहिजे. महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासंबंधात आई, वडील, भाऊ या कुटुंबातील सदस्यांमध्येच जागृती होणे गरजेचे आहे. शहरात आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत त्याची सारखीच गरज आहे. मासिक पाळीसंबंधात मुलींनी न्यूनगंड बाळगू नये, असा सूर जागतिक महिला दिनानिमित्त दैनिक ‘देशदूत’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात निघाला.

‘महिलांमधील स्वच्छता व आरोग्य’ या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात उद्योजिका स्नेहा गायकवाड, कविता देवगावकर, अंजली मेहता, अलका खैरनार, डॉ.मनीषा शिंदे, डॉ.कविता गाडेकर, डॉ.वर्षा लहाडे, डॉ.आभा पिंप्रिकर, डॉ.कांचन देसले, डॉ.मनीषा जगताप, ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, मुख्य उपसंपादक वैशाली सोनार-शहाणे, भाग्यश्री उमदी यांनी सहभाग घेतला.

महिलांबाबत स्वच्छता व आरोग्याबाबत घरात ज्या गोष्टी बोलल्या जात नाहीत त्या गोष्टींची समाज माध्यमांवरही मुलींची चर्चा होत नाही. मुलीने काय काळजी घ्यावी याबाबत त्यांना शिकवणे गरजेचे आहे. सॅनेटरी नॅपकिनचा वापर करावा व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशा सूचना मुली व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे? या मुद्द्यावरून चर्चासत्रास सुरुवात झाली. शहरी ग्रामीण भागात सॅनेटरी नॅपकिनचा वापर होतो. मात्र ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी आहे. कपडा हे एकच माध्यम वापरले जाते. तेच-ते कापड वापरल्याने महिला व मुलींना त्रास होतो. याबद्दलची माहिती त्यांना द्यायला हवी. तेच-तेच कपडे वापरल्याने अनेक प्रकारचे संसर्ग तसेच कर्करोगाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. याबाबत जनजागृती झाली पाहिजे.

मुलींमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता नाही. स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. संसर्ग झाला तर वेळीच उपाय करायला हवेत. तरुणींनी कुठलाही न्यूनगंड न ठेवता मोकळेपणाने बोलावे व काही त्रास असल्यास वेळीच उपचार करावा. ग्रामीण भागात महिलांच्या स्वच्छतेविषयी खुलेपणाने बोलले जात नाही. अशावेळी मुलींनी आपल्या आईला सांगणे आवश्यक आहे. आई आणि मुलगी यांच्यातील नाते मैत्रिणीसारखे असायला हवे. मुले समाज माध्यमांवर अपडेट होतात. तसे मुलींनीही आपल्या स्वच्छतेबद्दल अद्ययावत माहिती ठेवणे गरजेचे आहे. लग्नापूर्वी स्वच्छता तसेच सेक्सबद्दल खुली चर्चा होत नाही. म्हणून यासाठी मुलींपेक्षा आईलाच प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात जाऊन स्वच्छतेविषयी काम करणे विविध संस्थांनी आवश्यक आहे, असेही मत चर्चात सहभागी तज्ञांनी व्यक्त केला.

…तर संकोच गळून पडेल
मासिक पाळीला मुली प्रॉब्लेम म्हणतात. खरे तर असा शब्दच वापरणे चूक आहे. त्यापेक्षा पाळी म्हटले तरी चालेल. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन जास्त आहे. पाळीकडे सकारात्मक म्हणून कसे पाहावे याची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. महिलांच्या स्वच्छतेबाबत मुलांना समजावून सांगितले तर तेही समजून घेतील. त्यातून मुलींबाबत मुलांमध्ये असलेला संकोचही दूर होण्यास मदत होईल. त्या चार दिवसांंबाबत भाऊ-वडील यांनीही मुलींना मदत करणे गरजेचे आहे. यातून मुलींमधील संकोच गळून पडेल. मुलींमधील स्वच्छतेबाबतची माहिती मुलांपर्यंतही पोहोचणे गरजेचे आहे. अलीकडे असा बदल होत आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. याबाबत पालकांशी बोलणे महत्त्वाचे आहे. याची सुरुवात घरापासूनच झाली तर समाजही बदलेल, असा विचारही चर्चासत्रातून उमटला.

- Advertisment -

ताज्या बातम्या