Thursday, May 2, 2024
Homeनगरधान्याचे दरफलक दर्शनी भागात लावा

धान्याचे दरफलक दर्शनी भागात लावा

पुरवठा विभगाचे स्वस्त धान्य दुकानदारांना आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांना किती धान्य मिळणार आहे, धान्याचे दर काय आहेत याची माहिती ठळक व स्पष्ट दिसेल, अशा पद्धतीने दर्शनी भागात लावावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा विभागाने धान्य दुकानदारांना दिल्या आहेत. तसेच दुकानांमध्ये येणार्‍या नागरिकांशी संयमाने व सौजन्याने बोलण्याच्याही सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. लोकांचा संयम सुटत चालला असल्याचे दिसून येत आहे. अशा अवघड परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना धान्याच्या अपेक्षा आहेत. दुकानदार खंबीरपणे आपले कर्तव्य बजावत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे; मात्र, त्याचबरोबर दुकानदारांची जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे. त्यांनी काही सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. त्यामध्ये मोफत तांदूळ सर्वांना नियमाप्रमाणे मिळेल, याबाबत संवेदनशील रहावे.

केशरी रेशनकार्डधारकांची नोंद दिलेल्या नमुना रजिस्टरमध्ये न विसरता घ्यावी, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी यांची यादी दर्शनी भागात लावावी, लोकांच्या अडचणी समजावून घेऊन आपल्या स्तरावर प्रश्न सुटतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, निर्देशाप्रमाणे केशरी रेशनकार्डधारकांच्या रेशनकार्डवर धान्य दिल्याबाबतचा शिक्का न विसरता मारावा, वीसपेक्षा जास्त व्यक्ती रांगेत उभ्या असल्यास त्यापुढील व्यक्तींना पंधरा जणांना एक तास या हिशेबाने तासातासाची वेळ ठरवून द्यावी.

रांगेत उभे व्यक्तीसुद्धा मास्क लावून एकमेकांमध्ये सुरक्षित वावर ठेवतील याबाबत दक्ष रहावे. गरीब लाभार्थ्यांना धान्य विहित दरात मिळेल, याबाबत संवेदनशील राहावे, अशा सूचनांचा पुरवठा विभागाने दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या