Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedआरोग्यधन प्राप्तीसाठी हिवाळा उत्तम ऋतू; आयुर्वेेदतज्ञ डॉ. विनोद गुजराथी यांची मुलाखत

आरोग्यधन प्राप्तीसाठी हिवाळा उत्तम ऋतू; आयुर्वेेदतज्ञ डॉ. विनोद गुजराथी यांची मुलाखत

देशदूत ‘डिजिटल’ आवृत्ती : आमच्या गप्पा

पाहुणे : आयुर्वेदतज्ञ डॉ. विनोद गुजराथी

- Advertisement -

विषय : हिवाळा आणि आयुर्वेद

संवाद : एन. व्ही. निकाळे

नाशिक । विशेष प्रतिनिधी

आरोग्याबाबत आयुर्वेदात खूप छान सुभाषित आहे… ‘आरोग्यं धनसंपदा’! आरोग्य चांगले असेल तर तेच आपले खरे धन आहे. आपण सगळे जण मात्र धनाच्याच मागे लागतो. आरोग्यधन कमावण्यासाठी हिवाळ्यासारखा ऋतू नाही. तेव्हा हिवाळ्याचा फायदा घ्या. चांगला आहार ठेवा. आरोग्यासाठी झोप महत्त्वाची आहे. कोणत्याही तणावाशिवाय गाढ झोप घेतली पाहिजे. हिवाळ्यात निसर्गाकडून जास्तीत जास्त आरोग्य मिळवावे, असा सल्ला नाशिकचे प्रख्यात आयुर्वेेदतज्ञ डॉ. विनोद गुजराथी यांनी दिला…

दैनिक ‘देशदूत’ डिजिटल आवृत्तीच्या ‘आमच्या गप्पा’ या साप्ताहिक उपक्रमात डॉ. गुजराथी यांनी सहभाग घेतला. ‘हिवाळा आणि आयुर्वेद’ या विषयावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वृत्तसंपादक एन. व्ही. निकाळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आयुर्वेदात ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत असे एकूण सहा ऋतू मानले आहेत. त्या ऋतुमानानुसार ऋतुचर्या आणि दिनचर्या सांगितलेली आहे.

हिवाळा हा हेमंत आणि शिशिर या ऋतूंचा कार्यकाळ आहे. हवेत गारवा असल्याने आपले शरीर उत्साहीत राहते. पचनशक्ती सुधारलेली असते. भूक चांगली लागते. हिवाळ्यात दिवसापेक्षा रात्र मोठी असल्याने झोपेचा कालावधी वाढलेला असतो. साहजिकच सकाळी उठल्यावर अतिशय ताजेतवाने वाटते.

सुरूवात उत्साहवर्धक असल्यावर सकाळी उठल्यावर व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे. व्यायामामुळे शरिराला एक प्रकारचे स्थैर्य प्राप्त होते. विविध घटक निर्मितीला चालना मिळते. रोगप्रतिकार शक्तीही वाढते. साधारणत: 45 मिनिटे किंवा एक तासाचा व्यायाम आपली शक्ती आणि वयाप्रमाणे केला पाहिजे. आहारात पौष्टिक घटकांना सामावून घेतले पाहिजे. हिवाळ्यात भूक वाढलेली असते. पचनशक्ती सुधारलेली असते. अशावेळी आहाराला महत्त्व दिले पाहिजे, असे डॉ. गुजराथी म्हणाले.

गरमागरम, चमचमीत, झणझणीत असे पदार्थ खाताना एक महत्त्वाचा मंत्र लक्षात ठेवायचा. जिभेचा विचार करण्याआधी आतड्यांचा विचार करावा. जिभेला चांगले लागले म्हणून त्याचे सेवन केले त्याच्या आहारी गेले तर विविध प्रकारचे आजार तयार करतात. हे आजार टाळण्यासाठी अशा पदार्थांच्या आहारी न जाता अधून-मधून बदल म्हणून खाण्यास हरकत नाही, असेही डॉ. गुजराथी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या