Wednesday, February 19, 2025
HomeनाशिकNashik Political : महाजनांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुसे-कोकाटेंमध्ये...

Nashik Political : महाजनांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भुसे-कोकाटेंमध्ये रस्सीखेच  

मंत्री माणिकराव कोकाटेंनी सूचक विधानही केले

नाशिक | Nashik

राज्य सरकारकडून (State Government) दोन दिवसांपूर्वी म्हणजेच (दि.१८) रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची (Guardian Minister) यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे (दि.१९) रोजी सामान्य प्रशासन विभागाने जीआर काढत रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. त्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात रस्सीखेंच सुरु झाली आहे.

- Advertisement -

महायुतीमध्ये पालकमंत्रीपदाचे वाटप प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवरून ठरल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार आहेत. तर रायगड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वाधिक आमदार (MLA) आहेत. या संख्या बळानुसार रायगडचे पालकमंत्रीपद शिंदेंच्या शिवसेनेला तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणे अपेक्षित होते.मात्र भाजपच्या आगामी वाटचालीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांची नियुक्ती केली होती. मात्र, आता या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता येथे नव्याने नियुक्ती होते की, राजकीय तोडगा काढला जातो हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

तर आज माध्यमांशी बोलतांना मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले की, “पालकमंत्रीपदाची नेमणूक करणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली असते. मी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी फिरतो आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची आमची मागणी पूर्वी देखील होती आणि आजही आहे. नाशिकमध्ये आमचे सात आमदार असल्याने आमची या जिल्ह्यासाठी पालकमंत्रीपदाची मागणी आहे. मी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे, पंरतु माझ्याबाबत माझा पक्ष निर्णय घेईल. माझी नंदुरबारच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याने त्यात मी समाधानी आहे”, असे त्यांनी म्हटले.

दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्रीपद माणिकराव कोकाटे यांच्या ऐवजी गिरीश महाजन यांना द्यावा,‌ असा एक मतप्रवाह महायुतीमध्ये आहे. तर नाशिक जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ आणि शिवसेनेचे दादा भुसे मंत्री आहेत. यामध्ये झिरवाळ हे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी फारसे इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भुसे आणि कोकाटे यांच्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेंच सुरु असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून परतल्यावर काय तोडगा काढतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कारण रायगडच्या पालकमंत्रीपदी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे यांची नेमणूक व्हावी यासाठी शिंदे आग्रही होते. मात्र, रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे शिंदे अचानक त्यांचे मुळगाव असलेल्या दरे गावाकडे रवाना झाले. यानंतर आज त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) दरे गावाला रवाना झाले आहेत. या तिघांमध्ये पालकमंत्रीपदावरून चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भेटीत कोणता तोडगा निघतो? हे लवकरच कळेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या