अहिल्यानगर । Ahilyanagar
देशातील पाच राज्यांच्या रणधुमाळीसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच, मतदारांनी प्रस्थापित नेतृत्वावर आणि विकासकामांवर विश्वास दर्शवल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चीत केले आहे, तर राहुरीत अक्षय कर्डिले यांनी विजयाचा ‘ट्रॅक’ पकडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीचा बालेकिल्ला पुन्हा एकदा सत्तेच्या बाजूने झुकवला आहे. पाचव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार तब्बल ४५,०१० मतांनी आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, दुसऱ्या फेरीअखेर त्यांना १६,५४३ मते मिळाली होती, तर चर्चेत असलेले अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले (१५ मते) आणि करुणा मुंडे (१८ मते) यांना साध्या शंभरीचा आकडाही गाठता आलेला नाही. ‘नोटा’लाही ४८ मते मिळाली असून, या मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोणताच तगडा उमेदवार टिकू शकलेला नाही.
अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अक्षय कर्डिले यांनी विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पाचव्या फेरीअखेर कर्डिले यांना २५,४०८ मते मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना अवघी ३,५२२ मते मिळाली आहेत. अक्षय कर्डिले यांनी २१,८८६ मतांची निर्णायक आघाडी घेत आपला विजय जवळपास निश्चित केला आहे. या ठिकाणी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कर्डिलेंच्या झंझावातासमोर कुठेच तग धरू शकलेले नाहीत.
बारामतीत काँग्रेसच्या आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने निवडणूक एकतर्फी झाली होती. उर्वरित २१ अपक्ष उमेदवारांनी सुनेत्रा पवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी स्पष्ट कौल महायुतीच्या पारड्यात टाकला आहे. राहुरीतही भाजपने आपली संघटनात्मक ताकद सिद्ध करत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. सध्याची आकडेवारी पाहता, दोन्ही मतदारसंघांत महायुतीचा विजय केवळ औपचारिकता उरला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. दुपारपर्यंत अधिकृतरीत्या विजयाची घोषणा होण्याची शक्यता आहे.




