Tuesday, October 15, 2024
Homeनाशिकऐतिहासिक 'साल्हेरच्या' पाहणीसाठी युनेस्कोचे पथक येणार; जिल्हाधिकारी शर्मांकडून परिसरात पाहणी

ऐतिहासिक ‘साल्हेरच्या’ पाहणीसाठी युनेस्कोचे पथक येणार; जिल्हाधिकारी शर्मांकडून परिसरात पाहणी

नाशिक | Nashik
सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये महाराष्ट्रातील पर्वतरांगेतील सर्वात उंच असलेल्या नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचा लवकरच जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश होणार आहे. ‘युनेस्को’चे पथक या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी दि. २७ किंवा दि. २८ सप्टेंबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.११) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साल्हेर किल्ल्याच्या सद्य स्थितीची पहाणी केली. साल्हेर किल्ल्याच्या परिसराच्या स्वच्छतेचा व सुशोभीकरणाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभ्या असलेल्या या गडकिल्ल्यांवर आता लवकरच जागतिक स्तरावरुन ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटणार आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजीर किल्ल्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश व्हावा, यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. या यादीत नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचा समावेश आहे.

- Advertisement -

‘युनेस्को’ चे पथक या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून त्याबाबत वारंवार आढावा घेण्याचे काम सुरु आहे. मंगळवारी (दि.१०) याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली होती.

‘युनेस्का’च्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांची नोंद झाल्यानंतर सगळ्या जगाला शिवरायांच्या थोरवीची नव्याने ओळख होईल. जगभरातले पर्यटक या किल्ल्यांना भेटी देतील. युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले तर इतिहासातले नवे दुवे जगासमोर येऊ शकतील, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुरातत्व विभागाच्या बैठकीत देण्यात आली. मराठा लष्करी वास्तूसंरचना या प्रकारात राज्य पुरातत्व विभागाने १२ किल्ल्यांच्या शृंखलेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने युनेस्कोला सादर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील साल्हेर (जि. नाशिक), शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशा राज्यातील ११ तसेच तामिळनाडूतील जिंजीर किल्ल्यांचा समावेश आहे.’

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या