Monday, November 30, 2026
Homeनाशिकमहिला ही घराचा आत्मा; छंद जोपासणे ही मोठी कला - भाजप महिला...

महिला ही घराचा आत्मा; छंद जोपासणे ही मोठी कला – भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

नवीन नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

महिलांचे आयुष्य अनेक जबाबदार्‍यांनी व्यापलेले असते. घर, कुटुंब आणि मुलांची जबाबदारी सांभाळताना स्वतःचे छंद जोपासणे हीदेखील एक मोठी कला आहे. महिला ही घराचा आत्मा असून तिच्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका डॉ. योगिता हिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चित्रा वाघ यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, छाया देवांग, रोहिणी नायडू, नगरसेवक शरद फडोळ, मुकेश शहाणे, मंडल अध्यक्ष डॉ. वैभव महाले, राजेंद्र जडे, तुळशीराम भागवत, अर्चना दिंडोरीकर, रोहन कानकाटे, अनिता भामरे, स्वाती भामरे आदी उपस्थित होते.

यावेळी वाघ म्हणाल्या की, महिला दोन दिवस घराबाहेर राहिली तरी घराची काय अवस्था होते, यावरून तिचे कुटुंबातील महत्त्व समजते. मुलांकडून काही चुकीचे घडल्यास सर्वप्रथम आईला जबाबदार धरले जाते. त्यामुळे महिलांवर कुटुंबासह समाजाप्रतीही मोठी जबाबदारी असते. रांगोळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नसून ती भारतीय संस्कृती, परंपरा आणि मांगल्याचे प्रतीक आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांचे मॉल उभारण्यात येणार आहेत.

महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ व विविध वस्तू या मॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांना स्वावलंबी होता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानाला प्राधान्य देत स्वच्छ भारत अभियानांतर्गत घराघरांत शौचालयांची निर्मिती केली. महिलांना उघड्यावर शौचास जाण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच महिलांना राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी देण्याचे कामही मोदी सरकार करीत असल्याचे वाघ यांनी नमूद केले.

स्पर्धांचे निकाल
प्रथम क्रमांक : श्रुतिका बंडू गायकवाड यांना दहा ग्राम चांदीचे नाणे
द्वितीय क्रमांक : रेखा सोमासे,दिव्या शिंदे,रुचिका कदम,नेहा चंदे यांना सोन्याची नथ
तृतीय क्रमांक : ११ महिलांना पैठणी साडी व चतुर्थ क्रमांक २१ महिलांना पूजेचे ताट

ताज्या बातम्या

Crime Diary : गुन्हेगारी टोळ्यांची मस्ती जिरविण्यासाठी पोलिसांचा धडाका

0
अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला आहे. मकोका, एमपीडीए आणि हद्दपारी अशा कठोर...